पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तशी गावक-यांची नातीही. खेडं हे माणसाचं मोकळे मैदान असतं. राहणं, बोलणं सारं मोकळं! तिथं समाजजीवनाचे प्रश्न माणसाला जितक्या सहजपणे येऊन भिडतात, बिलगतात तितके शहरात नाही. शिवाजी पाटील त्यांच्यामध्ये सतत दडलेल्या शिक्षक कार्यकत्र्यानं आजूबाजूला जे घडतं त्याचं चौकस। भान ठेवलं. त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न समजून भिडत गेले. त्यांना समजलेल्या प्रश्नांच्याच कथा झाल्या.

 ‘वळणावरची वाट' या कथासंग्रहात ‘संसार... संसार', 'वळणावरची वाट', 'बहुरूपी', ‘अतिलोभ', 'लग्नाचा वाढदिवस’, ‘आघात', 'देवदासी', ‘हरवलेले मंगळसूत्र', “जळीत', 'शेतकरी राजा' सारख्या कथा आहेत. कथा शीर्षकातूनच विषय वैविध्य लक्षात येतं. ब-याचशा कथा वर्णन शैलीने विकसित होत राहतात. जागोजागी कथाकारांनी संवादांची योग्य पेरणी केली आहे. कथा लिहिण्यामागे समाज समस्यांचे वर्णन करण्याची तळमळ दिसून येते. हे सारं करण्यामागे समस्या निराकरणाचा हेतू स्पष्ट दिसतो. त्या दृष्टीनं पाहिलं तर या सहेतुक कथा होत. साच्या कथांची पार्श्वभूमी ग्रामीणच. त्यामुळे कथांना नैसर्गिक सहजतेचं वरदान लाभलं आहे.

 ‘संसार... संसार' कथा ग्रामीण भागातील अष्टौप्रहर गरिबीची कथा

आहे. रामभाऊ गरिबीमुळे रोगग्रस्त पत्नी लक्ष्मीस जमिनीचा तुकडा विकला तरी वाचवू शकत नाही. पदरात दोन मुलं घेऊन विधुर बापाला जगण्याची वेळ येते तेव्हा आकाश असं फाटतं की टाका कुठं नि कसा घालावा हे। कळेनासं होऊन जातं! ‘बहुरूपी'स कथा म्हणण्यापेक्षा आपल्या सहयोगीसहका-यांचे बहुरूपी व्यक्तिचित्रण शोभावं! या व्यक्तीचित्रात्मक कथेत लेखकातील आस्वादक निरीक्षक ध्यानी आल्यावाचून राहात नाही. ‘वळणावरची गोष्ट' ही पारंपरिक प्रेमकथा. प्रेम जुळत आलं असताना गुंगारा देऊन लग्न केलेल्या प्रेयसीच्या हुरहुरीनं रंगलेली ही गुलाबी कथा. तीत तारुण्यसुलभ भाबडेपणाचं लेखकानं सुंदर वर्णन केलं आहे. प्रत्येकाच्या आकाशी मावळणारा सूर्य असतो' असं जीवनसूत्र सांगणारी ही कथा ‘अतिलोभ' ही ‘अति तेथे माती' सूत्र समजावणारी. हरामाने आलेल्या पैशाचा माज माणसाला मस्तवाल करतो पण जीवनात पायाखालची वाळू सरकवणारे घर कोसळण्यासारखे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा माणसाचे पाय जमिनीवर आपसूक येतात हे या कथेत लेखकाने परिणामकारकरित्या चित्रित केले आहेत. सुमन नि रवीन्द्राच्या पुनर्मीलनाची ही सुखान्त कथा लेखकाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा परिचय देते.

प्रशस्ती/२६