पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

एका कथेत ते त्यांचे समग्र आयुष्य चित्रित करतात. सूचकतेने समग्र व्यक्त करण्याचं वरदान लाभलेली त्यांची लेखणी म्हणूनच एका छोट्या कळशीत । व्यापक कैलास भरून टाकते. हे येतं उत्स्फूर्त लेखन ऊर्जेमुळे. ही ऊर्जा हेच त्याचं खरं लेखन संचित होय.
 ‘धरबंध'मधील इंदू आयुष्यभर घरात पाणी भरत राहते. एके दिवशी विहिरीवर जगलेली इंदू विहिरीतच बुडून मरते. तिचं प्रेत वर येतं तेव्हा विहिरीच्या काठावर कासव तरंगत असतं. इंदूचं प्रेत काढल्यानंतर ते । कासव कधी कुणाला दिसलं नाही असा उल्लेख ‘धरबंध' मध्ये आहे. ही सूचकता काय सांगते? मुक्या प्राण्यांचं दुःख? मूक माणसाचं प्राणतत्व? सूचकता इंदुची आहे आणि कासवाची पण! कासवाने आत्महत्या केली की मरण पत्करलं इंदूसाठी? रोज पाणी भरणाच्या इंदूशी कासवाशी जोडलेले गेलेले ऋणानुबंध एकीकडे नि घरासाठी कष्ट उपसणाच्या इंदूचं घरातलं परागंदापण हे सारं कलात्मकरित्या मोहन आळतेकर चित्रित करतात, त्याला तोड नसते. म्हणून वाचक वाचून त्यांना आवर्जून फोन करतात, दाद देतात वाचकांची दाद लेखकाला लिहिती राखत असते. आळतेकर वर्षोनुवर्षे लिहितात, ते समाजऋण फेडण्यासाठी व स्वतःला मोकळं करण्यासाठी.


 ‘करपून गेलेला वसंत', 'सोन्याचा कस’, ‘माझी आई', 'अधांतरी' च्या माध्यमातून लेखक आपल्या अनुभवाचं क्षितिज किती व्यापक आहे याची प्रचिती देतो. ही प्रचिती आकाश कवेत घेण्याचा लेखकाचा ध्यास होय. हे ध्यासपर्वाचे लेखन ‘मुंगी उडाली आकाशी' सारखं पकडता न येणारं. ज्यांना कुणाला आपली संवेदनशीलता तपासून घ्यायची असेल त्यांच्यासाठी हे लेखन तापमापकाचं कार्य करेल. कोरडे हृदय असो कुणाचं त्याचे डोळे पालवण्याचे सामर्थ्य या लेखनात आहे. दगडाला पाझर फोडण्याची किमया करणारे मोहन आळतेकर व त्यांचे हे सारे लेखन एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्यांनी नित्य लिहावे. पण आपले लेखन एकसुरी होऊ नये. म्हणून त्यांनी कथा, निबंध, लेख, काव्य, रूपक असे वैविध्यपूर्ण लेखन प्रकार हाताळायला हवेत. ते तसे करतील तर त्यांच्या लेखनाला नवी झळाळी लाभो. वैविध्यातील वैचित्र्य हे पण एका अर्थाने वाचकांना दिग्भ्रमित करणारं सौंदर्यच असतं. ते लाभेल तर हे लेखन सरस्वतीच्या कोंदणात अधिक देखणं रूप धारण करेल. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा!

◼◼


दि. जून २०१५


प्रशस्ती/२६७