पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 ही कविता मुखपृष्ठाप्रमाणे गुलमोहराची गर्द झाडी, सावली, सुगंध, रंगानी भरलेली, माखलेली आहे. सत्यास साक्ष ठेवून लिहिलेली ही कविता आत्म्याची सजावट आहे. कवयित्रीला आत्मा सजवावा लागतो. ती तिची चौकटीची मजबुरी आहे. ती नसती तर कविता आणखी खुलली असती, खरी झाली असती. कवयित्रीच्या मनाचा इमला वाळूचा ठरावा ही तिची शोकांतिका आहे. ते तिच्या अंतर्मनाचं शल्य आहे. ‘दुःख अंतरीचे सांडू कुठे?' सारख्या प्रश्नात तिची अगतिकता व्यक्त होते. व्यक्त व्हावं इतके अंतरीचे ढग भरून आलेत. तिला अश्रू परतवून लावायचे आहेत. कारण । तिला आपलं जीवन रडगाणं बनवायचं नाही. ती तराणा गाऊ इच्छिणारी मुक्त कोकिळा बनू इच्छिते. ते तिचं स्वप्न आहे. मनातली गृहितं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करूनही जमत नाही याचं तिला वाईट वाटतं. गृहिणी म्हणून किती समायोजन (Adjustment) करत राहायचं? हा अखिल भारतीय स्त्रीला पडलेला प्रश्न तिचाही यक्षप्रश्नच आहे. तरी ती फुला-फुलांत गंध शोधत स्वतःच स्वतःचं सांत्वन करत राहते. जग हिशोबाचं पुस्तक व्हावं याचं तिला दुःख आहे. तिच्या लेखी जगणं म्हणजे नात्यांचा निव्र्याज गोफ गुंफणं असतं. तिला पंखात बळ घेऊन उंच भरारी मारण्याची महत्त्वाकांक्षा आहे. पण जगण्याच्या बेड्या तिच्या पंखांना नेहमीच बंदिस्त बनवत आल्यात. ‘हम दो हमारे दो' ‘हमारा बजाज' असं आत्मकेंद्रित, बंदिस्त, मध्यमवर्गीय जगणं तिचं नाही. तिच्या जगण्याचा परीघ जग आहे. जागतिकीकरणातील तिची कविता म्हणून तर झाडाच्या फुटलेल्या पालवीला मोबाइलच्या चार्जरची उपमा देते. ती पतीला प्रेरणा मानते. पण पतीच्या लेखी ती कोण अशी तिची जिज्ञासा अतृप्तच आहे. कारण तो भरलेल्या ढगासारखा... नुसता भरलेला... पण न बरसणारा! स्त्रीला वाटत असतं आपल्या झिजण्याचं, सोसण्याचं, सहन करण्याचं कधीतरी कौतुक नसेना पण कृतज्ञ स्मरण व्हावं... जाण व्यक्त व्हावी. ती भावाची भुकेली बिचारी.
 या कवयित्रीला चांदण्यात न्हायचं आहे. पण ते तिच्या नशिबी नाही. कारण जगण्याची चौकट ती मोडू इच्छित असूनही शील, नातं, मर्यादा तिला ती विकल्पवाट घेऊ देत नाही. नियतीशरण तिचं जीवन ही तिची दुखरी नस आहे. तिची ठसठस या कवितेत भरून पावली आहे.
 यातील काही निसर्ग कविता विलक्षण आहेत. ‘सूर्यफुली'मधील सूर्यफूल, ज्वारी व तुरीमधील संवाद ‘हृद्य आहे. 'बहर सांडूनी वसंतातला झाला गुलमोहर मोकळा' सारख्या ओळी केवळ निसर्गाचं मोकळं होणं नाही


प्रशस्ती/२६०