पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वळणावरची वाट (कथासंग्रह)

शिवाजी पाटील

ओंकार प्रकाशन, कसबा वाळवे.

प्रकाशन - २00३

पृष्ठे - ८९ किंमत - रु. ४५/


ग्रामीण जीवनाच्या बोधक कथा


 श्री. शिवाजी पाटील हे योगायोगाने माझे विद्यार्थी. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. तेथून ते हिंदी विषय घेऊन बी. ए. झाले. महाविद्यालयीन जीवनात ते नियमित शिकू इच्छिणारे, वाचणारे विद्यार्थी होते. नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये उपजतच आहेत. त्यांची वृत्ती समाजशील व समंजस आहे नि होतीही. म्हणून ते महाविद्यालयीन शिक्षण काळात आम्ही चालवत असलेल्या हिंदी साहित्य मंडळाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचं स्मरतं. त्या काळातील त्यांची उपक्रमशीलता अजून माझ्या लक्षात आहे. नंतर ते बी. एड्. झाले. शिक्षक झाले. त्यांच्या कार्य, कर्तृत्वाची सतत चढती कमान पाहताना त्यांचा शिक्षक असण्याचा आनंद मला नेहमी होत आला. पण एक दिवस चक्क ते आपला कथासंग्रह घेऊन आले नि माझ्या आनंदाची जागा अभिमानाने घेतली.

 माणसाचं लिहिणं त्याच्या अस्वस्थतेचं द्योतक असतं. अस्वस्थता त्याच्या संवेदनशीलतेची खूण असते. संवेदनशीलता सजग निरीक्षणाची निशाणी असते. माणूस शिळोप्याचा उद्योग म्हणून लेखन करतो असं मला वाटत नाही. श्री. शिवाजी पाटील शहरात शिकले तरी शिकवतात खेड्यात. खेड्यातच ते जन्मले, वाढले, गावाकडची माती जशी त्यांना माहीत आहे

प्रशस्ती/२५