पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

नाही समजत. तो सुटा-सुटा समोर येतो. कवी व्यक्तिमत्त्व व वृत्ती कळायची तर अनेक कविता एकदम समोर यायला हव्यात. या संग्रहात सुमारे एक ८0 कविता आहेत. आकाराने म्हणाल तर त्या छोट्या कविता होत. त्यामुळे अल्पाक्षरी परंतु आशयगर्भ कुशल गायकाच्या तानेतील सूक्ष्मता यात नाही पण ती अनुभव वैचित्र्यानं नटलेली आहे. मुळात अनुभवाचा गाभा मजबूत असल्यानं ती पकड घेते पण पकडून नाही ठेवत. त्यासाठी कवीनं अजून बराच रियाज करायला हवा. काव्य रचनेतील गद्य प्रभाव जाईल तसा ही कविता अधिक कलात्मक होईल. कवितेत क्रियापदं शेवटी येत राहिली, अनावश्यक शब्द भेटत राहिले की कवितेतील । रसात्मकतेस हानी पोहोचते. म्हणून कवीचं लक्ष आशयाइतकंच अभिव्यक्तीकडे असायला हवं. वक्रता, अल्पाक्षरिता, ताल, अलंकार, संगीत, निसर्ग, सौंदर्य सारं कवितेत हवं पण आपसूक आलेलं!
 ‘दुःखभोग' मधील कविता भावप्रवण आहे. शोक, नैराश्य तिचा स्थायीभाव वाटतो. चिमण्या नाहीशा होणं, माणसाचं बुजगावणं होणं यातला कवीमनाचा विषाद वाचताच लक्षात येतो. या कवीला आपल्या डोळ्यातील आसवांपेक्षा बळीचे अश्रू अधिक अस्वस्थ करतात. त्या अर्थानं ‘दुःखभोग' काव्यसंग्रह व्यापक वेदनेचे वर्तुळ घेऊन येतो. कवितेत अनेक ठिकाणी व्यक्तिगत जीवनातले हळवे कोपरे, खुणा आहेत, पण ओढ मात्र समाजाची नक्की! दलित कवीच्या मनातली श्रद्धास्थानं तुम्हास या कवितांत जरूर भेटतील. पण म्हणून ही कविता दलित नाही होत. तिचा पोत ग्रामीण कवितेशी सूत बांधणारा, नाळ जोडणारा वाटतो.
 कुणी सांधावा फुटला बांध
 बळीच्या मनाचा?
 विचारणारा हा कवी आपणास या संग्रहात जागोजागी भेटतो. ‘अत्तदीप भवो' म्हणणारी कविता 'स्व'पेक्षा ‘पर'च्या शोधास अधिक आसुसलेली वाटते. वाट पाहणारं, श्वासात अडकलेलं या कवितेतलं गाव मिटल्या पापण्यांचा हिशोब मागतंय. आभाळ, पाऊस, बळी, शेत, झरे, काजवे, माती इ. प्रतिमानं घेऊन येणारी ही कविता श्वास, अश्रू, हुंदके इ. मुळे माणूस व निसर्गातलं नातं, द्वंद्व समजावते. 'देवाचिया द्वारी', 'ठेका', ‘जातो रे' सदृश्य रचनात अभंग-ओवींचा प्रयोग या कवितांना, त्यातील दुःखाला आध्यात्मिक पातळीवर नेऊन बसवतो.
 ‘दुःखभोग' काव्य संग्रह समग्रतः जगण्याचा शोध होय. तो घेत कवी स्वतःला सानुला करत अधिक मोठं जग कवेत घेऊ इच्छितो. 'माझे


प्रशस्ती/२५७