पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

विहिरी खोदल्या. किर्लोस्करवाडीत किर्लोस्करांच्या लोखंडी नांगराचा कारखाना सुरू झाल्यावर यांच्याच दारूचे सुरुंग उडवले गेले व कातळातून पाण्याची कारंजी व पाझर निर्माण झाले. सुरुंगाच्या दारूचा उपयोग करून पारतंत्र्यास हादरा देण्याचं त्यांनी ठरवलं नि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारचे ते खंदे समर्थक व भूमिगत सहाय्यक झाले. स्वातंत्र्यानंतर सुरुंग उडवणाच्या हातांनी सेवाधर्म स्वीकारून कुंडलला आपले कार्यक्षेत्र बनवले. व गरीब, वंचित, दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून त्यांनी रचनात्मक, विधायक कार्याची कास धरली ती अखेरच्या श्वासापर्यंत. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे यांच्या माळेतील पुढचा मणी म्हणून ते ममतेची माउली व सेवेची सावली झाले.
 या स्मारक ग्रंथात लेख, आठवणी व पत्रांचा संग्रह आहे. लेख दोन प्रकारचे आहेत. एक समकालीन समवयस्कांचे व दुसरे समकालीन उत्तराधिका-यांचे. समकालीनांच्या लेखातून तांबट काकांचे कार्य जिवंत होते. उत्तराधिका-यांच्या लेखातून आदरभाव स्पष्ट होतो. या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. हा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकार्याचा आलेख जसा आहे तसा तो सेवाभावी स्वातंत्र्योत्तर समाजकार्याचा दस्तऐवजही. यातून महाराष्ट्रातील वसतिगृहांचा इतिहास समजतो. तसेच क्रांतिकारकांची शौर्यगाथा म्हणूनही त्याचे मोल आहे. असा बहुगुणी स्मारक ग्रंथ एकविसाव्या शतकातील पिढीपुढे अशासाठी असणे आवश्यक आहे की आजच्या पिढीस दूरचं दिसेनासं झालंय. त्यांनी ऐकून घ्यायचंही बंद केलंय. स्कार्फस्, इअर फोन्स, मोबाइल्स, गॉगल्स हेच नाही का सिद्ध करत? । |
 अशा काळात ‘दलित मित्र तांबट काका' हा स्मारक नि गौरव ग्रंथ अंजनाचे काम करील. या ग्रंथात हे असू शकतं, हे होऊ शकतं, ठरवलं तर अशक्य नाही असा आश्वासक दिलासा देण्याचे बळ व विधायक कार्याची जी प्रेरणा ओतप्रोत भरलेली आहे त्यातून स्वार्थांध समाजातून परार्थाचा (परमार्थाचा नव्हे!), परहिताचा पाझर फुटेल अशी आशा आहे तसे झाले तर या स्मारक ग्रंथाच्या संकल्पातून नवसमाज निर्मितीची संजीवनी हाती आल्याचे समाधान संपादक, प्रकाशकांना लाभेल. तीच खरी संकल्पसिद्धी होय. कै. शं. वा. किर्लोस्कर, रा. ना. चव्हाण, शाहीर शंकरराव निकम, ल. गो. कासेगावकर (धन्वंतरी) प्रभृतींचे लेख तांबट काकांचे इतिहासजमा आयुष्य परत संजीव करतात. माणसास पुनर्जन्म नसतो, हे खरे पण आठवणींना मरण नसते याची साक्ष म्हणजे हा ग्रंथ.


प्रशस्ती/२५२