पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

रचनाबंध बहाल केला. दीर्घ प्रस्तावना लिहून खांडेकरांनी त्या त्या कादंबरीतील समस्या चित्रणामागील भूमिका विस्ताराने स्पष्ट केल्याने त्यांच्या कादंबच्या समकालीन समस्यांसंदर्भात केवळ वर्णन नव्हे, तर संदर्भ ग्रंथांचे कार्य करतात. १९३० ते १९७६ हा खांडेकरांच्या कादंब-यांचा कालखंड. या काळाचे समाज प्रतिबिंब त्यांच्या कादंब-यांत आढळते. विसाव्या शतकाच्या मध्यकाळातील समस्या ज्यांना शोधायच्या असतील, त्यासाठी या कादंब-या। म्हणजे सामाजिक दस्तावेजच होत. मध्यमवर्गीय समाज खांडेकरांच्या कादंब-यांचा केंद्र असला तरी त्यात दलित, पीडित, मजूर, अत्याचारित, प्रताडित स्त्रिया, शेतमजूर वर्ग सर्वांचे चित्रण आढळते. दुस-या महायुद्धानंतर घडलेल्या समाज परिवर्तनाने बदललेला समाज अधिक आत्मकेंद्री व भौतिक, लोभी झाला. शरीर सुखाच्या हव्यासाने त्याला 'ययाती' बनवले. ज्ञानपीठ पारितोषिकाचा मान मराठी सारस्वतास पहिल्यांदा मिळवून देणाच्या या रचनेने समाज शिल्पकार खांडेकर आणि त्यांच्या समस्या चिकित्सकाच्या द्रष्ट्या भूमिकेस राष्ट्रीय मान्यताच बहाल केली. मनाचा कांचनमृग झालेला समाज मृगजळातील कळी बनूनच राहणार हे खांडेकरांचे सुभाषित म्हणजे एक समाज भाष्य व सिद्धांतच होय.
  कथात्म साहित्यातील समस्या चित्रित करणारी वि. स. खांडेकरांची भाषा आणि शैलीचा स्वतंत्रपणे विचार करून डॉ. सविता व्हटकरांनी आपले विवेचन सारग्राही करण्याचा प्रयत्न केला आहे. खांडेकरांचं कथात्म साहित्य म्हणजे कल्पना आणि वास्तवाचा मेळ! आदर्श आणि यथार्थाची सांगड घालताना खांडेकर कधी कल्पना रम्यतेत तर कधी दुःखाच्या गर्तेत सापडतात. त्यानुसार त्यांची भाषा कधी हृदय पिळवटणारी तर कधी चांदणं । शिंपडणारी होते. अलंकार, सुभाषितांनी त्यांची शैली कधी चिंतनशील तर कधी जीवनबोधक बनते. हे सर्व सूक्ष्मतेने पकडून डॉ. व्हटकरांनी खांडेकर केवळ जीवनबोधक साहित्यकार नव्हते तर कलासक्त मन लाभलेले ते एक दिव्य कलाकार होते हे सांगितले आहे.


 ‘वि. स. खांडेकरांच्या कथात्म साहित्यातील समस्यांचे चित्रण' ग्रंथ खांडेकर साहित्य अभ्यासातील एक आश्वासक पाऊल होय. खांडेकरांच्या निधनास तीन दशकांचा काळ लोटला तरी त्यांच्या कथात्म साहित्यास नवा युवक वाचक वर्ग व नवे नवे संशोधक, अभ्यासक लाभतात यातच । त्यांच्या साहित्याचा मृत्युंजयी प्रत्यय येतो. तेच त्यांच्या साहित्याचं श्रेष्ठत्व म्हणावं लागेल.

◼◼



दि. ३० सप्टेंबर, २०११


प्रशस्ती/२४९