पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

केसरकरांनी हे लेखन मनस्वीपणे केल्याने ते मृत्युंजयी झाले आहे. त्याचे मूळ कारण लेखकाची बहुश्रुतता होय. हे लेखन अनेक संदर्भ, उक्ती, मिथक, म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, रूपकांनी भरलेले असल्याने ते कलात्मक, वाचनीय तद्वतच ते संग्राह्य बनून गेले आहे. त्याला धर्मनिरपेक्षतेबरोबर सर्वधर्मसमभाव ही भारतीय धर्मनिरपेक्षतेतून देव, दैव, दैत्य कल्पना वजा असतात. असतात फक्त विज्ञानाधिष्ठित मानवतावाद. उलटपक्षी सर्वधर्मसमभावमध्ये देव, धर्माबरोबर जातीय सहिष्णुतेचा भाव असतो. सर्वधर्माप्रती सद्भाव हे त्याचे मूल्य असते. महात्मा गांधी सर्वधर्मसमभावी होते. रॉयवादी नव्हते. शिवाय अशोक केसरकरांवर काँग्रेसी विचारसरणीचा प्रभाव स्पष्ट आहे. त्या अर्थाने ते भांडवलवादी व्यवस्थेच्या बाजूने उभे राहतात. 'लोक सहभाग' शीर्षक स्फुटामध्ये ते सुविधांची किंमत मोजण्याच्या बाजूने उभे राहतात. 'लोककल्याण' व 'लोकविकास या दोन संकल्पना स्वतंत्र होत. लोककल्याणामागे समाजवाद, साम्यवाद उभा असतो तर लोकविकासामागे भांडवलवाद, जागतिकीकरण हे धनदांडग्यांचे समर्थन करते. ते इतक्या सूक्ष्मतेने सर्व गोष्टींकडे पाहून विचार करतात की नाही मला माहीत नाही. पण कल्याणापेक्षा विकासपक्षी विचारधारा त्यांना उत्तर आधुनिक बनवते, हे मात्र खरे.


 आज कुणाची कुणाला फिकीर नसल्याच्या काळात ते समाजाची चिंता वाहात लेखन करतात. यातच त्यांची सामाजिक बांधिलकी सामावलेली आहे. माझ्या दृष्टीने ती मोलाची गोष्ट आहे. घेतला वसा टाकू नये म्हणत त्यांनी ती जपली, जोपासली तरच समाज नावाची गोष्ट उद्या शिल्लक राहील. अन्यथा, प्रत्येक मनुष्य बेट बनण्याचा काळ अवतरल्याशिवाय राहणार नाही. भारताचा ‘स्वित्झर्लंड व्हायचा नसेल तर अशोक केसरकरांनी लिहीत राहिलेच पाहिजे. त्यांच्या लेखनास शुभेच्छा!

◼◼


दि. २३ मार्च, २०१७


प्रशस्ती/२४३