पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसे डाव्या चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांची कविता म्हणजे शेतमजूर, कामगारांचे अश्रू सांगत समाजाला त्या वंचितांचे समर्थक करण्याचा खटाटोप असायचा. शाहीर विठ्ठल उमप तर ‘जय भीम' म्हणत धारातीर्थी पडले. विश्वासराव चव्हाण हे शिक्षक समितीचे लढवय्ये नेते होते. समाजातल्या सर्वांप्रती आदर, प्रेमभाव जपणारे प्रभाकर आरडे संपादक म्हणून उदारवादी असल्याचे या श्रद्धांजली लेखांमधून जाणवते. त्यात उपचार नाही तर कृतज्ञताभावाने हे लेख भारलेले आहेत.

 ‘इजिप्तच्या लोक आंदोलनाचे महत्त्व मातीचे गणपती व नैसर्गिक रंगच वापरा', ‘निरपराध्यांना त्रास होणारी 'रास्ता रोको' सारखी आंदोलने थांबवावीत', जपानवर आपत्ती व जपान्यांचा निर्धार' असे काही अग्रलेख आहेत की जे संपादकांचा व्यासंग अधोरेखित करतात. ‘लबाडांचे आवतन', ‘चोराला मलिदा, आणि धन्याला धत्तुरा' असे वाक्प्रचार वापरून लेखक आपले मत एकाच वेळी ललित व जहालपणे मांडतो. मोरपीस नि मशालीचा हा संगम म्हणजे संपादकांची आगळी लेखनकळा होय. जपान्यांना सलाम अग्रलेख आपल्या माणूस घडणीतील अनुकरणीय वस्तुपाठ वाटतो ते । लेखकाच्या व्यापक वृत्तीमुळे. जो लेखक, शिक्षक शिकण्यास, अनुकरण करण्यात तत्पर असतो, तिथेच विकास नि घडणीच्या लक्ष लक्ष संभावना असतात, हे समजाविणारे हे लेखन म्हणजे लोकशिक्षणच! ‘शांतता या निमित्ताने येवो' मध्ये प्रभाकर आरडे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालखंडातील काही घटनांचा उल्लेख केला आहे. पण त्यापेक्षा ‘पंतप्रधानांनी शब्द खरा केला' मध्ये एका प्रामाणिक माणसाबद्दल केलेले भाष्य जास्त आश्वासक ठरते. सन २०१० चा अग्रलेख. त्यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने डॉ. मनमोहन सिंग यांना निर्दोष जाहीर केले आहे. असे परिस्थिती व व्यक्तीचे मूल्यांकन करण्याची क्षमता संपादक आढळणे हे या लेखनाच्या दर्जेदारपणावर मोहर उठवणारे ठरते.

 वृत्तपत्र सृष्टीत अग्रलेख, संपादकीय मजकुराचे जे महत्त्व आहे, ते जनमत संग्रहाचे साधन व माध्यम म्हणून. त्यामुळे तर इंग्रजीत त्याला 'Editorial' बरोबरच 'Opinion' असा समानार्थी शब्द वापरला जातो. वृत्तपत्रे ही प्रतिकूल परिस्थितीत समाजमनाचा मोठा आधार असतात. भारतात आणिबाणी निर्माण झाली तेव्हा संपादकीय मजकुराची जागा कोरी ठेवून संपादकांनी आपली नाराजी ‘मौन' हे बोलण्या-लिहिण्यापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दाखवून दिले आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे कठीण प्रसंगी मौन धारण करीत. वृत्तपत्र सृष्टीत असं मानलं गेले आहे

प्रशस्ती/२३७