पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/237

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राज्य आल्याने लेखकाची होणारी तगमग एका सच्च्या भारतीय नागरिकाची वाटते. लेखक पुरोगामी खरा पण त्याला डावा म्हणून उपेक्षित करता येणार नाही. अशी त्याची कर्तव्यबुद्धी लेखनाबद्दलचा आदर वाढवते. सांस्कृतिक धोरण सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने अंगीकारल्यावर लेखक शिक्षण धोरण कधी? अशी पृच्छा करणारा अग्रलेख लिहितो. या सर्वांतून प्रभाकर आरडेंचे लेखन एका जागरुक नागरिकाचे सिद्ध होते. शेवटच्या माणसाचे भान' हे या सर्व अग्रलेखांचा आधार असल्याने या लेखनास सामाजिक बांधिलकीचा आपसूक स्पर्श असतो.

 जागतिकीकरणाचे अरिष्ट म्हणजे खेळ, मनोरंजन, व्यापार इ. द्वारे समाजात घुसखोरी करणारा चंगळवाद. आयपीएल, सौंदर्य स्पर्धा, एक घेतली की दूसरी वस्तू मोफत असे फसवे फंडे म्हणजे अज्ञानी सामान्य माणसाचं शोषण व त्याच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची लूट. ऑन लाईन खरेदीत ‘अटी लागू' एवढ्या दोन शब्दावर होणारी फसवणूक म्हणजे या बोटाची थुकी त्या बोटावर फिरवायचा गंडीव-फशिव खेळ. त्याचा पर्दाफाश व वस्त्रहरण करून प्रभाकर आरडेंनी 'माँ' करून त्यांचा केलेला निषेध असंसदीय शब्दात असला तरी शोषणाच्या पार्श्वभूमीवर नरमच वाटतो. भोपाळ वायू दुर्घटनेचा न्याय पाहता लेखक त्यापुढे जे प्रश्नचिन्ह ठेवतात, ते समर्थनीयच होय. ‘उशिरा मिळणारा न्याय अन्यायच असतो. मुक्त। अर्थव्यवस्थेस त्यांनी केलेला विरोध केवळ विरोधासाठी नसून आक्षेपार्ह वाटतो. दहशतवाद मग तो कोणत्याही तत्त्वज्ञानाचा मुखडा घेऊन येवो, त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असा ते जो ‘आरडंट व्ह्यू' ठेवतात त्याच्याशी कोणीही सहमतच राहणार. वारंवार प्रभाकर आरडे आपल्या अग्रलेखांमधून घोषणांचा तिटकारा करतात, कारण कृतिहीन घोषणांसारखी दुसरी फसवणूक नसते, याचा त्यांनी तीन दशके निरंतर अनुभव घेतलेला असतो. सरकार फसव्या घोषणा देते पण माध्यमांच्या वार्तांकनाची सत्यासत्यता न पाहता, खातरजमा करून न घेता एका मुख्याध्यापकाला मात्र तडकाफडकी निलंबित करते, तो मुख्याध्यापक आत्महत्या करतो, याचा कुणाला राग येणार नाही? अग्रलेख हे जनमत तयार करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे वृत्तपत्रशास्त्र सांगते, ते इथे पटल्याशिवाय राहात नाही.

 सदर संग्रहातील काही लेख हे श्रद्धांजलीपर अग्रलेख आहेत. ‘सूर्या आला तळपून गेला’, ‘ताठ मानेचा करारी नेता’, ‘शाहीर विठ्ठल उमप अमर रहे’ सारखे लेख या संदर्भात सांगता येतील. हे लेख फार अभ्यासपूर्ण नसले तरी श्रद्धेने ओथंबलेले आहेत. कविवर्य नारायण सुर्वे प्राथमिक शिक्षक होते

प्रशस्ती/२३६