पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पंडित नेहरू अशा मान्यवरांवर भाषणे आहेत. ही भाषण नव्या वक्त्याला, विद्यार्थ्यांना ‘तयारीचे भाषण' स्पर्धेत कसे असायला हवे याचा वस्तुपाठ समजावतात. शिवाय रोजच्या व्यवहारात समाज प्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास, प्रसार माध्यमे, लेक वाचवा अशा विषयावर विचार व्यक्त करायचा प्रसंग आल्यास त्यावर भाषण देत यावेत म्हणून काही खड़े (मसुदे) आहेत. दुसरे ३५ भाषणांचा हा संग्रह म्हणजे वक्त्यासाठी गुटिकाच. बाळ गुटिकेत जसे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सत्व, घटकांचा मेळ असतो, तसे हे बालामृत बनले आहे.
 ही सर्व भाषणे संदीप मगदूम यांनी चतुरस्त्र वाचन करून तयार केलेली प्रत्ययास येतात. अनेक संदर्भ ग्रंथ त्यांनी हाताळलेले लक्षात येते. भाषणांच्या प्रारंभी व्यक्तिचित्रे/छायाचित्रे टाकून ती बोधक बनविली आहेत. भाषणांची भाषा सुबोध आहे. वाक्ये छोटी असल्याने ती विद्याथ्र्यांच्या स्मरण पटाच्या कक्षेत सामावणारी, अविस्मरणीय बनणारी ठरली आहेत. मध्ये मध्ये सुभाषिते, श्लोक, व्याख्या, सूत्रे, उदाहरणे देऊन बोधप्रद बनविली आहेत. या भाषण संग्रहाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. वर्तमान एकविसावे शतक बहुभाषी आहे. जनव्यवहार मातृभाषेकडून राष्ट्रभाषेकडे व अंतिमतः जागतिक भाषा वा आंतरराष्ट्रीय भाषेकडे अग्रेसर आहे. शिक्षणाचे माध्यम बदलण्याचा हा संक्रमण काळ आहे. हे लक्षात घेऊन नमुन्यादाखल काही हिंदी, इंग्रजी भाषणांचे मसुदे पेश केले आहे. यामुळे हा भाषण संग्रह त्रिभाषा सूत्राचा अनुकरणीय परिपाठ झाला आहे. अलीकडे सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे फुटलेले पेव पाहता याची गरजही स्पष्ट होते.

 ‘वक्तृत्वधारा' मधील भाषणे ज्ञान, माहिती, वर्णन असा फेर धरत ती अंतिमतः प्रबोधनमाला बनतात. भाषणस्पर्धेत मुले पाठवायची म्हणजे शिक्षकांना भाषणे लिहून द्यायचा कित्ता गिरवत बसावे लागते. आज हे काम शिक्षकांपेक्षा पालक रस घेऊन कष्ट घेऊन करताना दिसतात. नाव मात्र शाळा, शिक्षकांचे होते. अशा परिस्थितीत पालकांना गुगल गुरूची मनधरणी, शोध घेणे इ. सोपस्कार करावे लागतात. अशा पालकांना हा । संग्रह धीर नि दिलासा देणारा ठरेल. कट, पेस्ट, फॉरवर्डच्या काळात । भाषणांचे नवेनवे मसुदे उपलब्ध होणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होऊन बसले आहे. त्या संदर्भातही भाषणांचे हे नमुने नावीन्यपूर्ण ठरतात. वक्तृत्व कलेच्या प्रारंभापासून ते शास्त्र बनण्याच्या विकास काळात यात ज्या नव्या घटकांची भर पडली ते समयसूचकता वैश्विकता, ज्ञानवाहिता इ. गुणांचे प्रतिबिंब वाचकांना या पुस्तकात आढळेल.

प्रशस्ती/२३२