पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सार्वजनिक समाज नियंत्रणात खुलेपणाने सहभागी होत असे. प्रोटॅगरस, गॉर्जीअस, हिपीअस इ. सॉफिस्ट शिक्षक हिरिरीने वादविवादात भाग घेत. पाचव्या शतकाच्या आसपास पेरिक्लीझ आणि डिमॉस्थिनीझ हे प्रसिद्ध वक्ते उदयाला आले. अॅरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस हे लेखक, तत्त्वचिंतक तसेच वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. सिसेरो हा वक्तृत्वावर लिहिणारा आरंभिक लेखक होय. 'रेटोरिका अँड हेरे' हे त्याचे पुस्तक. यातून त्याने या कलेचे नियम, गुण इ. विशद केले. भाषणांच्या पाय-या स्पष्ट केल्या. नवा विषय, मांडणी, शैली, स्मरणशक्ती, अभिव्यक्ती पद्धती हे वक्तृत्व घटक त्याने प्रथम अधोरेखित केले. त्यानंतर सिसेरोने ‘द ओरंटर' ग्रंथ लिहून वक्त्याचे गुण मांडले.

 अशा विविध प्रयत्नांमधून वक्तृत्वाच्या स्वरूप, तत्त्व, विशेषाची बांधणी झाली. सभेत उभे राहून बोलावे. असे बोलावे की ऐकणारे श्रोते प्रभावित होतील. त्यांची अंतःकरणे भरून येतील, प्रेरित होतील. वक्त्याने असे नवे ज्ञान, संदर्भ, उदाहरणे द्यावीत की श्रोत्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारून जावेत. श्रोत्याची तहान, भूक, झोप हरवावी असे भाषण हवे. ते असे उत्कंठापूर्ण असावे की कधीच संपू नये असे श्रोत्यांना वाटावे. या आशयाचा संस्कृत भाषेत प्रसिद्ध श्लोक असून त्यातून भाषणाची आदर्शवतता निश्चित होते. युरोपप्रमाणे आशिया खंडातही या कलेचा प्रादुर्भाव पूर्वापारच म्हणावा लागेल. खण्डनमण्डनातून इथे नव्या ज्ञानाची निर्मिती झाली. त्या काळात शंकराचार्य, मंडनमिश्र, कुमारिलभट्ट ही नावे प्रारंभिक वक्ते म्हणून पुढे येतात. महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या सामाजिक सुधारणा घडून आल्या त्या तत्कालीन वक्त्यांमुळेच. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीत वक्त्यांचे योगदान कोण नाकारेल? स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील धुरंदर आधी वक्ते होते. नंतर नेते झाले. त्याचे नेतेपण तर त्यांच्या वक्तृत्वावरच उभे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, प्रा. ना. सी. फडके प्रभृती मान्यवरांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. यशवंतराव चव्हाणही लोकनेते बनले ते सादमय वक्तृत्वामुळेच.

  या सर्व पार्श्वभूमीवर संदीप मगदूम यांचे हे पुस्तक ‘वक्तृत्वधारा वाचत असताना लक्षात येते की या परंपरेचा विकास वर्तमानात होत राहावा अशी त्यांची धडपड नि तळमळ दिसते. यात राजर्षी, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. जे. पी. नाईक, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, संत गाडगे महाराज,

प्रशस्ती/२३१