पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/231

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. 'वाक्' म्हणजे वाचा. वक्तृत्व ही म्हणून वाचिक कला मानली जाते. भाषण शब्दाने तिचा शब्द भाषेशी जोडला जातो. संभाषण शब्द श्रोता सूचित करतो. श्रोत्यांशी केलेला संवाद म्हणजे संभाषण. वक्तृत्व हा श्रोता नि वक्त्यातील संवाद होय. असाच एक शब्द आहे संबोधन. वक्ता कुणाला तरी उद्देशून बोलतो. माणूस स्वतःशी बोलतो तर इतरेजनांशी केलेले संबोधन विशिष्ट उद्देश, कारण, हेतूने होत असते. इंग्रजीत Rhetoric, Oratary, Adress, Speech, Elocution असे अनेक शब्द भाषणासाठी वापरले जातात. भाषणांचा इतिहास मोठा रंजक आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय्य हक्कांच्या प्राप्तीसाठी म्हणून भाषणाचा उगम झाला. भाषणाने लोकशाही जन्माला घातली असे म्हटले तर वावगे ठरू नये. लोकशाहीची सर्वांत मोठी देणगी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रथम ते वक्तृत्वाने जन्मले नंतर वाङ्मयाने जोपासले. साहित्य त्याचेच लिखित रूप होय.

 वक्तृत्व कला म्हणून जन्माला आली. आज तिचे विधिवत शास्त्र बनले आहे. या कलेचा जन्म इसवीसन पूर्व पाचव्या शतकात ग्रीकमध्ये । झाला. ग्रीक आणि रोमन संस्कृतीने जी नगर राज्ये जन्माला घातली तिच्या विकासात वक्तृत्वाचा इतिहास दडलेला आहे. प्रामुख्याने ही कला अथेन्स नि रोम शहरात जन्माला आली. रोम शहर फिरत असताना मी वक्तृत्व कलेच्या कितीतरी पाऊलखुणा अनुभवल्या आहेत. सिसिली बेटावर सिराक्यूस वसाहत होती. तेथील आदिवासी हे तेथील मूल निवासी. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर धनाढ्यांनी बळेच कब्जा मिळवलेला होता. नगर राज्यांच्या स्थापनेनंतर अत्याचारित, शोषित वंचित जनतेस न्याय मिळण्याचा हक्क नि संधी प्राप्त झाली. मूल निवासींनी जुलमी जमीनदारांवर खटले भरून न्यायाची मागणी केली. त्या वेळी जमिनीची कागदपत्रे, दाखले असे पुरावे नव्हते. वहिवाट भोगवटा म्हणजेच हक्क नि मालकी. आपल्या जमिनी धनाढ्यांनी फसवून जुलमाने बळकावल्या हे सिद्ध करण्यासाठी बिनतोड बाजू मांडणा-यांची, युक्तिवाद करणा-यांची गरज निर्माण झाली. त्या काळात अशी जी शहाणी माणसं होती त्यांनी तर्कसंगत, बिनतोड युक्तिवाद केले ते म्हणजेच भाषण कलेचे आद्य नमुने होत. असा युक्तिवाद करणारा सिसिलियन ग्रीक कोरेक (Korax) हा आद्य वक्ता म्हणून ओळखला जातो.

 सिराक्यूझमधून या कलेचा प्रचार अथेन्समध्ये झाला. त्यातून तेथील लोकशाहीस प्रेरणा मिळाली. त्या काळात अथेन्समधील जनता न्याय व

प्रशस्ती/२३०