पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/225

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चारित्र्य अनुभवायला मिळाले, त्याआधारे मी हे सप्रमाण सांगू शकेन की हा गृहस्थ विचार, आचाराचे अद्वैत व्यक्तिमत्त्व घेऊन उभा होता. त्यांचा जीवन व्यवहार निरअहंकारी, सदाशयी होता. पण विचार व आचार दोन्ही पातळीवर प्रतिबद्ध हा माणूस सतत परिणामकेंद्री कृतीबद्दल विचार करत असायचा. डॉ. दाभोलकरांना आपले जीवन शिळोप्याचा उद्योग वा रिकामा खटाटोप कधीच वाटला नव्हता. उलटपक्षी नित्यनूतन सकारात्मक, विधायक कृतीशी साद घालत रोज एक पाऊल ते आपल्या ध्येयाप्रत चालत असायचे. मरणोत्तर का असेना, पण महाराष्ट्र सरकारने नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम - २०१३' मंजूर केला, ही त्या प्रवासाची इतिःश्री म्हणायची पण त्यासाठी त्यांना आपलं जीवन खर्ची घालावं लागलं, सनातनी विचारांनी त्यांचा बळी घेतला ही अत्यंत शल्यकारक गोष्ट होय. महात्मा गांधींनी अहिंसेचा पुरस्कार केला व ते हिंसेचेच शिकार झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी नरबळी आदी अघोरी प्रथांचा विरोध केला पण सनातनी वृत्तींनी त्यांना नरबळी बनवले. हे सारे डॉ. दाभोलकरांनी जपल्या, जोपासलेल्या सुसंस्कृत, संयमी, विधायक सत्याग्रही वृत्ती विरोधाचा हट्टाग्रह ठरावा याला काय म्हणावे? डॉ. दाभोळकरांची अभिव्यक्ती व तिची वैशिष्ट्ये डॉ. शानेदिवाणांनी एका स्वतंत्र प्रकरणात या चरित्रात शब्दबद्ध केली आहेत. ती वाचत असताना, हे सर्व आठवत राहतं. त्या अर्थाने हे लेखन कृती मागची कारणमीमांसा म्हणून महत्त्वाचं ठरतं. डॉ. दाभोलकरांना असलेली साहित्य, कला, काव्य, संगीताची जाण लेखक स्पष्ट करतो खरा, पण त्यातून चरित्र नायकाचे व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होते, तेच अधोरेखित होत राहते. पण म्हणूनही सदर चरित्र वाचनीय तसेच विचारणीय सिद्ध होते. ते मुळातूनच वाचायला हवे.

 ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार' ग्रंथात डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी वैचारिक पक्ष स्पष्ट करताना अंधश्रद्धेचे स्वरूप तीन भागात स्पष्ट केले आहे. एक आहे ‘अंधश्रद्धा' आणि दुसरा आहे ‘धर्म' आणि तिसरा आहे विवेकवाद. अंधश्रद्धेचा संबंध वैचारिक धारणेशी असून धर्माचा संबंध कर्मकांडांशी आहे. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मनुष्य घडायचा तर जुन्या धारणांमधून जसा तो मुक्त व्हायला हवा, तसाच तो उपवास, तापास, व्रत-वैकल्य, करणी-भानामतीतूनही. सदर चरित्र हे सारे समजावते. म्हणून ते लोकप्रबोधनाचे प्रभावी साधन बनून पुढे येते. डॉ. दाभोलकर कोणा एका विशिष्ट धर्म व आचरणाविरुद्ध नव्हते. सर्व धर्मातील दैवीकरण,

प्रशस्ती/२२४