पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/220

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मान्य सूची व सर्वेक्षणात नोंदलेली नाही. ती हिंदी, मराठी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती सा-याचा मेळ घेत स्वतःचं स्वतंत्र रूप, शब्दकळा घेऊन येते. थारो, मारो, खादो अशी ओकारान्त क्रियेची ही बोली. शिव्या आणि शाप, शौर्य आणि क्रौर्य, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या परीघातलं हे जीवन मात्र संभावित, संभ्रांत समाज परिघाबाहेरचं, गावकुसाबाहेरचं. गावापलीकडील गोसाव्यांची वस्ती म्हणजे पोलिसांसाठी हक्काचे संशयित गुन्हेगार मिळण्याचे ठिकाण. मानव अधिकारांचा मागमूस नसलेलं हे जग । जात पंचायतीच्या वात्याचक्रात सतत भरडलं जाणारं. ‘भंगार' हे आत्मचरित्र जात पंचायतीविरोधी जिहाद होय. ते जात पंचायतीच्या आणि खरं तर । जात व्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाची मागणी करतं. त्या अर्थाने सामाजिक न्यायाच्या संदर्भात ‘भंगार' हा वंचितांचा टाहो आहे. न्हनू, होबडी, मोरणी, बायना, भरत्या, सांबा, परशा, केच्या, आळंद्या, बारीबुढा ही सारी पात्रं नावानं नवी तशी त्यांच्या ओळखीही नव्या. खंडोबा, सितला, मरीआई, लक्ष्मीची भक्ती करत रंगीबेरंगी झेंडे गाडत वस्ती दर वस्ती नवं जीवन सुरू करणारं हे जग रोज नवा प्रपंच मांडतं. त्या अर्थानं जीवन खरंच विंचवाच्या पाठीवरचं बि-हाड होऊन जातं.

 ‘भंगार' आत्मचरित्र अनेक प्रश्न उभे करतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वतःचा घेतलेला शोध, स्वतःची शोधली, मळलेली वाट सारं वाचत असताना प्रश्न पडतो की अनुवंश, परिस्थिती मोठी की माणसास लागलेला अंतरीचा शोध, विकास नावाची गोष्ट भौतिक समृद्धीतून येते की आत्मविकासाच्या ध्यासातून? स्त्री-पुरुष भेदाचे नष्टचर्य संपून स्त्री माणूस केव्हा होणार? माणसास कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... तिथे कल्याणकारी, विकासगामी नियोजन असते का? मानवाधिकार, समानता, माणुसकी 'माणूस' नसलेल्या समाजास वर्गास मग ते दलित, वंचित, अनाथ, उपेक्षित कोणीही असो केव्हा मिळणार? जात पंचायत नि जात व्यवस्था आपणास त्यांचं खरंच समूळ उच्चाटन करायचं आहे का? या नि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारं हे आत्मकथन म्हणजे दलित, वंचितांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेला जाबच आहे.

 अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं, लेखनात जी प्रगल्भता दाखवली ती पाहिली की वाटतं संस्कार, वळण सारं व्यर्थ. श्रेष्ठ ते । स्वतःचा विवेकी शोध नि समाजाचा पुनर्णोध! या सर्वांबद्दल त्यांचे मनःपूत कौतुक नि अभिनंदन! मराठी वाचक ‘भंगार' वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाही. ती ऊर्जा या

प्रशस्ती/२१९