पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संवाद वडीलकीचा असतो. त्यातून त्यांच्यापुढे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित होत राहतात. ज्येष्ठ नागरिक हे समाजधन खरे. समाज प्रशासन त्यांची काळजी वाहतो. तसे त्यांचेपण समाजाप्रती काहीएक कर्तव्य असते, अशी लेखकाची धारणा आहे. त्यातून ते ज्येष्ठांनी समाज सेवा केली पाहिजे, अशी आग्रही मांडणी करतात. ज्येष्ठांनी स्वविकासाबरोबर समाज कर्तव्यपरायण राहायला हवे, हे सांगायला लेखक विसरत नाही. भटक्या जमातींचा विकास त्यांना जीवन स्थैर्य लाभल्याशिवाय होणार नाही, हे डी. बी. पाटील यांचे समाजभाष्य त्यांच्या सामाजिक बांधिलकीची फलश्रुती म्हणावी लागेल. हुंडाबंदी, स्त्रियांचे अधिकार, महिला दिन, स्त्रियांचे संरक्षण, सक्षमीकरण सारखे लेख केवळ स्त्री दाक्षिण्याच्या भावनेतून केलेला शिळोप्याचा उद्योग नाही. तर ती स्त्रीविषयक असलेली लेखकाची भावसाक्षरता आहे. आणि म्हणून या लेखांचे असाधारण सामाजिक महत्त्व आहे.

 ‘शैक्षणिक विचार (भाग - ४)' हा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या संवेदी समाजशील मनाचा आविष्कार होय. हे पुस्तक वाचून संपवता येत नाही. संपतही नाही. ते वाचनानंतर वाचकास अंतर्मुख करते, अस्वस्थ करते. इतकेच नव्हे तर त्याचा पिच्छा पुरवून ते त्यास आतून बाहेरून बदलून विधायकपणे कृतिशील करते. शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांविषयी जनसामान्यांत जाणीव जागृती करून ते प्रत्येकाचे जीवन पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, सकारात्मक व्हावे म्हणून प्रयत्न करताना दिसते. समाजप्रती लेखकाची बांधिलकी म्हणून निर्माण झालेला हा ग्रंथ समाज व शिक्षणसंबंधी सर्व घटकांनी मुळापासून वाचावा. जो हा ग्रंथ वाचेल तो प्रगल्भ होईलच होईल. शिवाय दुसच्यासही तो प्रबुद्ध करेल. या लेखनाबद्दल आदरणीय डी. बी. पाटील सर यांचे आभार आणि अभिनंदनही!

◼◼

दि. २० जानेवारी, २०१७

प्रशस्ती/२१२