पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपन्न तर होतोच पण त्याला विषयाच्या विविध पैलूची - सहजीवन, स्वावलंबन, व्यक्तिमत्त्व विकास, प्रबोधन, नेतृत्व, श्रम, संस्कार इ. माहिती होते व वाचकाचे आकलन विस्तारते. समज रुंदावणारा लेखक द्रष्टा मानला जातो. डी. बी. पाटील सर असे द्रष्टे लेखक असल्याने त्यांचे लेखन वाचकास मार्गदर्शक ठरते. भारत सरकारने सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला खरा पण या कायद्यातून ० ते ६ वयोगटातील बालकांना वगळले. डी. बी. पाटील हे शिक्षणतज्ज्ञ असल्याने त्यांचे लक्ष नेहमी निर्णयांतील त्रुटींकडे जात असते. त्याच्यातील लेखक मर्मावर बोट ठेवणारा कुशल निरीक्षक जसा आहे, तसा तो चिकित्सक समीक्षकही. डी. बी. पाटील सरांनी शासनाची दाखवून दिलेली सन २००९-१० ची त्रुटी भारत सरकारने सन २०१६ च्या राष्ट्रीय शिक्षणात दुरुस्त केल्याचे दिसते. या धोरणात प्रथमच ३+ ते ५+ बालकांच्या शिक्षणाचा विचार राष्ट्रीय धोरणाचा भाग झाला आहे. ही डी. बी. पाटील यांच्या लेखनाची फलनिष्पत्ती मानावी लागेल. इतकेच नव्हे, तर पूर्व प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी मान्य करण्याप्रत वा अंगणवाडी शिक्षिकेस मानधनाऐवजी वेतन मान्य करणे हे बालशिक्षणास राष्ट्रीय मान्यता देण्याचेच ते द्योतक होय.
 या ग्रंथात शिक्षणासंबंधी आदर्श शिक्षक, स्वच्छ, सुंदर शाळा, विद्यार्थ्यांचे अपयश, खेळ, गरिबांचे शिक्षण, शिक्षण गुणवत्ता, बहुजनांचे शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, शैक्षणिक संस्थांचे स्थैर्य इ. बहुस्पर्शी लेख आहेत. या विविध लेखांतून लेखक त्या विषयासंबंधी विविध पैलूंचा ऊहापोह करत विविध शैक्षणिक प्रश्न आणि समस्यांची मांडणी करतो. इथे हा लेखक-शिक्षक समाज-शिक्षक, लोक-शिक्षक, लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावतो. ती त्याची भूमिका मला समाजातील सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना मांडण्याच्या अंगाने संवेदी वाटते. त्यामागे शिक्षण क्षेत्र निर्मळ, निष्प्रश्न करण्याचा ध्यास नि तळमळ प्रेषितापेक्षा कमी नाही. असे लेखन करायचे तर तुमची वृत्ती कळवळ्याची असावी लागते. ती लेखकामध्ये आहे. सदर लेख वाचताना ती अधोरेखित होत राहते.

  शिक्षणाचे स्वतंत्र अस्तित्व केवळ ज्ञानमय असते. ते जीवनसापेक्ष व्हायचे तर शिक्षण समाजोपयोगी व्हायला हवे. ते समाजहितवर्धक तेव्हाच होते, जेव्हा ते समाज प्रश्नांची उकल करण्याचे साधन म्हणून साकारते. त्यासाठी शिक्षण तज्ज्ञास वेगवेगळे सामाजिक प्रश्न माहीत असावे लागतात. डी. बी. पाटील यांचा सामाजिक वावर हा बहुआयामी असतो. शासन, संस्था, प्रशासक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याशी त्यांचा संपर्क आणि

प्रशस्ती/२११