पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठसा आज पाच-पन्नास वर्षे उलटली तरी आहे तसा आहे. नंतरच्या काळात मी शिक्षक झालो. संघटनेचा कार्यकर्ता झालो. त्या काळात ते कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक संघात सक्रिय होते. नंतर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांच्याबरोबरच्या कार्यात मी त्यांना जवळून अनुभवले. परत आम्ही योजलेल्या महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मी त्यांचे सहृदय सहकार्य पाहिले. राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवात तर खांद्याला खांदा लावून कार्य केले. मला या सर्वांत लक्षात आलेली गोष्ट अशी की डी. बी. पाटील सरांमधील शिक्षक, प्रशासन सतत विचार आणि आचार अशा दोन्ही पातळ्यांवर एकाचवेळी समान पातळीवर अस्वस्थ असतो नि सक्रियही. त्यांची सक्रियता अस्वस्थतेची कृतिशील प्रतिक्रिया असते. त्यांच्या हातून घडलेले लेखन याचाच परिपाक वाटतो.

 एका शिक्षकाचे समाजभान म्हणून डी. बी. पाटील सरांच्या लेखनाकडे पाहणे आवश्यक आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या शिक्षण-विषयक चिंतनपर लेखांचे तीन ग्रंथ ‘शैक्षणिक विचार' (भाग १, २ आणि ३) यापूर्वी त्यांनी प्रकाशात आणले आहे. शिवाय ‘कर्मपूजा' हे त्यांचे आत्मचरित्र मी वाचल्याचे आठवते. त्यांच्यावर बेतलेला एक अमृत महोत्सवी गौरव ग्रंथही मी अभ्यासला आहे. या सर्वांतून पुढे येणारा हा लेखक कर्मपूजक साधक वाटतो. शिक्षण हा त्यांच्यासाठी जीविकेचा विषय नसून शिक्षण हे मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणून ते त्याकडे पाहतात. शिक्षणविषयक शासन निर्णय प्रत्येक वेळी योग्य असतातच असे नाही. शासन निर्णयांच्या शिक्षणविषयक विविध घटकांवर होणा-या संभाव्य इष्ट-अनिष्ट परिणामांविषयीचे डी. बी. पाटील सरांचे चिंतन शिक्षण संस्थाचालक म्हणून नसते तर शिक्षण हितैषी, शिक्षणप्रेमी म्हणून असते हे। विशेष. म्हणून ते शिक्षण संबंधी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या विविध घटनांची मोट बांधून ‘शैक्षणिक व्यासपीठ तयार करून त्यामार्फत सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक संघटन तयार करतात, यातच त्यांच्या विचार आणि व्यवहाराचे चातुर्य दिसून येते. ते शासन विरोधक नाहीत पण शिक्षण हितकर्ते म्हणून शासनास त्यांचे म्हणणे ऐकावे लागते. शासनाने आपल्या पूर्व निर्णयात केलेले अनेक बदल हे डी. बी. पाटील सरांच्यातील द्रष्ट्या शिक्षणतज्ज्ञाचे यश होय. ही अनुभवसंपन्नता हे त्यांच्या लेखनाचे, चिंतनाचे, विचारांचे खरे अधिष्ठान होय. म्हणून ‘शैक्षणिक विचार' (भाग - ४) हा ग्रंथ शिक्षणसंबंधी सर्व घटकांनी

प्रशस्ती/२०९