पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शैक्षणिक विचार (भाग- ४)(लेखसंग्रह)
डी. बी. पाटील
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१७
पृष्ठे - २३८ किंमत - २00/

_______________________________________

शिक्षणविषयक जाणीव जागृतीचे समाजसंवेदी लेखन

 महाराष्ट्रातील थोर शिक्षण तज्ज्ञ आदरणीय डी. बी. पाटील यांचे ‘शैक्षणिक विचार (भाग - ४) या ग्रंथाची मुद्रणप्रत माझ्या हाती श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस, कोल्हापूरचे तरुण संचालक श्री. विनय पाटील यांनी दिली व प्रस्तावना लिहिण्याविषयी सुचविले. मला हा माझा बहुमान वाटला. पण दुस-याच क्षणी आपण काहीतरी औद्धत्य कृत्य करतो आहोत, याची जाणीव झाली व संकोच वाटला. पण सरांविषयीच्या माझ्या मनात असलेल्या अपरंपार आदरापोटी प्रस्तावना लिहिण्याचे सहर्ष । मान्य केले. डी. बी. पाटील यांचा मी अप्रत्यक्ष विद्यार्थी आहे. माणसाचे दोन शिक्षक असतात. एक वर्गात औपचारिक ज्ञान देणारे. दुसरे समाज जीवनात अनौपचारिक धडे देणारे. मला समाज शिक्षक हा शाळा शिक्षकापेक्षा नेहमीच मोठा वाटत आला आहे, तो अशासाठी की तो तुम्हाला ज्ञानाबरोबर जीवनदृष्टी व संस्कार देत असतो.
 मी आर्य समाज, कोल्हापूर संचलित शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत सन १९५९ ते १९६२ या काळात इयत्ता ४ थी ते ७ वी शिकलो. त्या काळात ते आमच्याच संस्थेच्या शेजारी असलेल्या हायस्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. वक्तशीरपणा, शिस्त याबाबतच्या त्यांच्याच लौकिकाचा माझ्या बालमनावर ठसलेला


प्रशस्ती/२०८