पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समन्वयक झाली. एका ठिकाणी १० परित्यक्ता न ठेवता त्यांना घरं दिली. संस्थाश्रयीचा कलंक गेला व ठपकाही. आपणाला आता संस्थाबाह्य उपाय शोधावे लागतील. भविष्य काळात शासनकेंद्री काम समाजकेंद्री व्हायला हवं. नियमबद्ध काम संस्कार, कर्तव्य, जबाबदारी म्हणून झालं तरच आपले प्रश्न सुटतील. कोणत्याही समाजात सदासर्वकाळ प्रश्न जर चेहरे बदलून येतच राहिले तर समाज सुधारला म्हणायचे कशाच्या आधारे ? याचा विचार व्हायला हवा. प्रभाकर केळकर यांच्यासारखे सेवाभावी कार्यकर्ते व आधाराश्रमसारखी संस्था दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेल्या काळात समस्यामोचनाचे उपाय, कार्यपद्धतीही नव्या अंगिकारायला हव्यात. आपल्या देशात अपंग व दुर्धर रोगग्रस्त बालके दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची क्षमता असलेली हजारो कुटुंबे आहेत. पण स्वतःपलीकडे जाऊन सामाजिक दुःख स्वीकारून ते निवारण्याची मानसिकता समाजात येणे म्हणजे ख-या मानवधर्माकडे आपण जात असल्याची ती खूणगाठ समजावी. प्रभाकर केळकरांच्या या पुस्तकोने मला परत १९८० च्या दशकात नेले. मी तेव्हापासून असे कार्य करत आलो आहे. नव्या सहस्रकाबरोबर मी चालायचे ठरवून संस्थात्मक परिघातून स्वतःस मुक्त करून घेतले. पण मी ना युद्ध सोडले, ना युद्धभूमी. शासन योजना, धोरण, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याबरोबरीने तेच काम मी आता व्यापक परीघावर करत आहे. सात जन्म घेतले तरी प्रश्न पुरून् । उरतील अशा देशात आपण असल्याने सतत विकास करत खिंड लढवत । राहिली पाहिजे. प्रभाकर केळकरांच्या सेवाभावास व आधाराश्रमाच्या समर्पणास सलाम!

◼◼

दि. ११ जून, २०१७
साने गुरुजी स्मृतिदिन

प्रशस्ती/२०२