पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



जडतो. आपली भविष्याची पुंजी ते तिच्यासाठी आश्रमाच्या हवाली करतात. आश्रमाला प्रश्नात पाडतात. आश्रम मुलींसाठी पुनर्वसन होईपर्यंतचे वसतिगृह काढण्याचा विचार करू लागतं. यातच त्या अनामिक आजोबांच्या देणगीचे खरे सार्थक! जे साहाय्य तुम्हास संकल्पास प्रेरित करते, ते दिलेल्या दानाचे मूल्य शतपटीने, भूमितीच्या पटीने वृद्धिंगत करते. रक्षाबंधन, भाऊबीज सारखे सण म्हणजे अशा संस्थांचे सामाजिक स्मरण करण्याचे निमित्त. पण इथे विदेशी दत्तक दिलेला मुलगा ‘बारक्या' सज्ञान होऊन परत येतो. पूर्वस्मृतींना उजाळा देत विस्मृत नात्यांना उभारी आणतो. नाती केवळ रक्ताची नसतात. खरे तर रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली, मानलेली नाती अतूट व अकृत्रिम असतात, हे आपण रोजच्या व्यवहारात अनुभवत असतो. रक्षाबंधन' रूपाने वर्णिलेली स्मृती हेच अधोरेखित करते.
 समाजात नैतिक, अनैतिक संबंधांविषयीच्या धारणा कालौघात बदलणे आवश्यक असल्याची जाण देणारी आठवण आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी?' एक अनौरस मुलगा कचराकुंडीत टाकायची क्रूरता आई करते ती केवळ समाज भ्रामक कल्पनांमुळे. हे बदलणं आवश्यकच नाही तर अनिवार्य असल्याच्या दोन आठवणी या संग्रहात आहे. एका मुलाला असंच उकिरड्यात टाकलं जातं. कुत्रे त्याच्या हाताचा लचका तोडून त्याला कायमचे अपंग करतो. देशपांडे नावचे संवेदनशील गृहस्थ आपल्याला मुलं असताना अपंग बाळास दत्तक घेऊन आपला सदाचार सिद्ध करतात. असाच एक मुलगा मालेगाव जवळच्या खेड्यात सापडतो. उपाशी अवस्थेत उकिरड्यात पडून राहिल्याने त्याचे आतडे चिकटते. शस्त्रक्रिया होते. ते बाळ विदेशी दत्तक जातं, कारण त्याला इथं कोणी पालक भेटत नाही. एड्स झाला म्हणून नाकारणारं एक जग नि तो झाला म्हणून स्वीकारणारं दुसरं उदार विदेशी जग! स्वदेशी समाज प्रगल्भ, परंपरामुक्त व नव्या, प्रगत विचारांचा केव्हा होणार असा भुंगा ही मुलं वाचकांच्या कानात । सोडतात. आश्रमाचं मोठेपण हेच की ते समाजाच्या दांभिक नैतिकतेजागी व्यवहारी नैतिकता रुजवतात. म्हणून समाजापेक्षा या संस्था श्रेष्ठ व पुरोगामी सिद्ध होतात. यातील अनेक आठवणीत दत्तक प्रक्रिया, पालक प्रकार इ. तपशील आले आहेत. त्यातून सकारात्मक सामाजिक प्रबोधन घडतं. हे या लेखनाचे खरे मोल. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं श्रेष्ठ, याची जाणीव या आठवणी समाजमनात रुजवतात.

 आधाराश्रमसारख्या संस्था म्हणजे सामाजिक प्रश्न समस्यांचे प्रतिबिंब

प्रशस्ती/२००