पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून केलं नाही. आश्रमाची कार्यपद्धती समाजास समजविण्याची त्यांची भूमिका आहे. तपभर कार्य करूनही या समग्र लेखनात 'मी'शब्द कुठेही आढळला नाही. या साच्या लेखनाचा कर्ता, कर्म, क्रियापद आधार आश्रम आहे. अशी कार्योत्तर तटस्थता, निरिच्छता, निरपेक्षता जपणे ही मला 'संत' कोटीतली वाटते. 'इदं न मम' किंवा 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु । कदाचन' असा निर्मोही जीवन यज्ञ फार कमी लोकांना साधतो. तो त्यांनी जपला, जोपासला म्हणून मी प्रस्तावना लिहायला धजलो. अन्यथा, आज घरचं खाऊन कोण लष्कराच्या भाकया थापतो, यावर समाज विश्वास ठेवत नाही. सामाजिक वातावरण संस्थाचालक नामक जमात सेवा समर्पित असण्याऐवजी प्रसिद्धी प्रवीण नि परायण असल्याचेच सर्वत्र दर्शन घडते.

 अत्यंत छोटेखानी आठवणींचं हे पुस्तक. पण त्यात ‘गागर में सागर भरल्याची प्रचिती हे लेखन देते. अनाथ आश्रमात येणारा प्रत्येकजण वंचित असतो. अनौरस अर्भक, कुमारी माता, परित्यक्ता, भिक्षेकरी मुले, अल्पवयीन वेश्या, विभक्त कुटुंबातील पाल्य, व्यसनी पालकांची अपत्ये अशा समाजाने नाकारलेल्या, टाकलेल्यांना संस्था पदरात घेते, कुशीत घेते व प्रेमाने सांभाळ करते. शासन काही एक अनुदान देते. देणगीदार रोख तसेच वस्तुरूप देणगी देतात. अपत्य नसलेली दांपत्य इथल्या बाळांना दत्तक घेऊन सनाथ करतात. परदेशी पालकांची उदारता तर शब्दातीत. या सर्वांचा मेळ संस्थाचालक व कर्मचारी घालतात म्हणून अनाथांच्या जीवनात कायाकल्प घडून येतो. हे कार्य करताना अनेक कडू-गोड अनुभव येतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे या आठवणीत लाखाची देणगी देऊन पावती व आयकराच्या सुटीची अपेक्षा न करणारे देणगीदार भेटतात तसे मुलांना बटाटे वड्यासाठी शिधा आणून दिल्यावर वडे तळून उरलेलं जळकं तेल बरणीत भरून नेणारे महाभागही भेटतात. नियमावर बोट ठेवून अव्यवहार्य सूचना करणारे सरकारी अधिकारी येथे भेटतात तसे साहाय्य तत्पर पोलीसही। भेटतात. दत्तक बालक होऊन विदेशात गेलेला बारक्या इथे भेटतो तो सज्ञान, सुखी होऊन. तर मला कशाला दत्तक दिलं, संस्थेत अधिक सुखी झालो असतो असा त्रागा करणारा दीपकही इथे भेटतो. हे सारं विश्व समाजाच्या रूढ परीघाबाहेरचे असल्याने सर्वसामान्यास ते अविश्वसनीय वाटले तरी वास्तव आहे खरे. कल्पनेपेक्षा वास्तव कधी कधी भयंकर असते.

 ‘अनोखे नाते' मध्ये आपणास एक अनामिक आजोबा भेटतात. देणगी द्यायच्या निमित्ताने ते आश्रमात येतात. एका चिमुरडीवर त्यांचा जीव

प्रशस्ती/१९९