पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उठणारे तरंग, भाव, विचार शब्दबद्ध केले आहेत. लेखकाचं वाचन चांगलं.बुद्धी तल्लख. समयसूचकता दांडगी. दृष्टांताचा चपखल प्रयोग करण्याचं कौशल्य त्यांच्या लेखनात सर्वत्र आढळतं. या गुणांमुळे सदरचं पुस्तक वाचनीयच नाही तर मननीय ठरतं. एखादा धर्मग्रंथ श्रद्धाळू माणूस नित्य उशाशी ठेवतो, तसा जगण्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी ठरावा असा हा ग्रंथराज अनेक थोरांच्या उद्धरणांनी सजलेला आहे. त्याचे सौंदर्य विचार जसे आहेत तसेच अभिव्यक्तीत ते सौंदर्य ठायीठायी वाचकाला भिडते, भावते.

 जीवनात निकराचा, बाका प्रसंग येतो तो विवेकाच्या क्षणी माणसाचे सारे पराभव विवेकाच्या क्षणी होतात. हिंदीत डॉ. शंकर शेष नावाचे नाटककार होऊन गेलेत. त्यांचं एक नाटक आहे. खजुराहो का शिल्पी'. ते नाटक दुसरे तिसरे काही नसून 'मोहाचा क्षण’ चित्रित करते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष साच्या रिपूंचा पराभव करण्याचे सामर्थ्य केवळ मोहाच्या क्षणात असतं. ज्याचा विवेक मोहाच्या क्षणी 'सत्' पक्षाकडे झुकतो त्याचा विजय होतो. हे अवघड कार्य मन करतं. मनासारखी चंचल वस्तू दुसरी । नाही हे जितकं खरं तितकंच मनासारखी कठोर वस्तू नाही हेही तितकंच खरं! ‘हिरा ठेविता ऐरणी!' ही त्याची कसोटी. माणसाच्या आयुष्यात कसोटीचे क्षण येतात. त्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडतो. कधी सदोष, कधी निर्दोष! पण सारं सापेक्ष असतं. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षण, प्रसंगांकडे कसे पाहता हे जितकं महत्त्वाचं तितकंच लोक तुमच्याकडे कसे पाहतात तेही महत्त्वाचं. 'स्व', 'पर', 'अन्य' असे दृष्टीचे तीन प्रकार असतात. पैकी पहिल्या दोन सापेक्ष तर तिसरी निरपेक्ष खरं तर वस्तुनिष्ठ! जीवनाकडे वस्तुनिष्ठ पाहण्याचं कसब जे आत्मसात करतात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते. “जीवन त्यांना कळले हो' ची स्वीकृती, मान्यता मिळवायची तर निरपेक्षतेसारखी दुसरी कसोटी नाही. ‘संवाद मनाशी पुस्तक क्षमा, शांती, चिंता, दुःख, सुख, नैतिकता, आदर्श, स्वातंत्र असा भाव, विचारांचा पिंगा घालत जीवन जगण्याची रीत समजावते. 'पेरते व्हा' चा संदेश देते. 'तुझे आहे तुजपाशी, परि जागा चुकलाशी' असं समजावणारं, हे पुस्तक केवळ उशाशी ठेवणारे निद्रिस्त जीवन जगतात. ‘रात्र वैच्याशी आहे, जागे रहा' हा खरा या पुस्तकाचा मंत्र. तो ज्यांच्या कानी-कपाळी घुमेल त्यांचे जीवन सुफळ, संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

 या पुस्तकात फ्रॉईड, जे. कृष्णमूर्ती, नेल्सन मंडेला, शेक्सपिअर अशा थोरा-मोठ्यांच्या उक्ती आहेत. सुभाषिते आहेत. म्हणी, वाक्प्रचार आहेत.


प्रशस्ती/१९६