पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पार्श्वभूमीवर झालेले असल्याने भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानाची चिकित्सा व भविष्यवेध असे त्याचे प्रागतिक रूपडे बनून गेले आहे.

 मोहन वायचळ यांनी सदर ग्रंथाच्या प्रारंभी प्रास्ताविक म्हणून लिहिलेला मजकूर वाचताना लक्षात येते की ते वास्तुकडे निर्जीव निर्मिती न मानता कलात्मक आविष्कार म्हणून पाहतात. वास्तूनिर्मितीचे घटक दगड, माती, सिमेंट, लाकूड, लोखंड निर्जीव असले तरी वास्तुशिल्पी त्यातून इमारत, रस्ते, पूल यांना आकार, प्रकारांचे जे घाट, वक्रता, त्रिमितिक रूप प्रदान करतो त्यातून जे शिल्प साकारते ते मनोहारी, ललित, विस्मयकारी असते. जगभर फिरताना मी जुन्या, नव्या किल्ले, मंदिर, चर्च, मशिदी, इमारती, संग्रहालये, मनोरे पाहिले आहेत त्या त्या काळच्या वास्तुशिल्पींनी काळाला साजेशा रचना करत त्यावर आपली दृष्टीमुद्रा उठवली आहे. साध्या गुंफांची खुदाई पाहिली तरी आदिमानवात ही शिल्पकार दडलेला होता हे। त्या गुंफेच्या आकार, वळण, उंची, जमिनीचा घाट पाहताना लक्षात येते. गुंफेतील शिल्पे असो वा चित्रकारी सारं वास्तुशिल्पशास्त्रास धरून असल्याचं लक्षात येतं. अजिंठा, वेरूळही मी पाहिले आहे नि फ्रान्स, जपानमधील, मलेशियातील गुंफाही. सर्वत्र वायचळ चित्रांची समर्पक पेरणी करतात. त्यामुळे मजकूर दृश्य होतो. त्यास ‘चक्षुर्वे सत्यम्'चे रूप येऊन जाते. आर्य चाणक्य, ब्रह्मगुप्त, कणाद, भास्कराचार्य त्यांना माहीत आहेत. नील कर्बुजिए, चार्ल्स कोरिया, लॉरी बेकर, आयफेलही ते जाणतात.

 पुस्तकाचा पहिला भाग ‘वास्तु संस्कृती'स समर्पित करून त्यांनी कोल्हापूर परिसरातील पुरातन वास्तूचे सौंदर्य विशद केले आहे. यात नगारखाना, नवीन राजवाडा, टाऊन हॉल, महालक्ष्मी मंदिर, किंग एडवर्ड रुग्णालय, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मौनी महाराज मठ त्यांनी चर्चिला आहे. कोल्हापूर रोमन काळापासून विश्व व्यापारी मार्गावरचे ठिकाण. त्यामुळे रेशीम मार्ग (सिल्क ट्रेड रोड) म्हणून ते पुरातन काळापासून जागतिक नकाशावर आहे. त्यामुळे इथे रोमन-ग्रीक संस्कृती, जैन संस्कृती, बुद्ध संस्कृती, इस्लाम संस्कृती, शिवशाही, आदिलशाही सातवाहन, बहामनी साम्राज्य सर्वांच्या कालगत पाऊलखुणा इथल्या वास्तूंवर आढळतात. शिल्पशैली सौंदर्य हेमाडपंथी तसेच आधुनिकही असा काळाचा विशाल पट मोहन वायचळ या ग्रंथातून उलगडत राहतात तेव्हा वाचक कल्पना, तर्काने थकून जातो आणि लेखकाच्या सव्यसाची व्यासंगाने चकितही होतो. लेखकास वास्तुशिल्प विद्येची सर्व अंगे माहीत आहेत. दगड, लाकूड, माती, शस्त्रे, अस्त्रे, शास्त्र, पुराण, इतिहास, सौंदर्यशास्त्र सर्वांगांनी

प्रशस्ती/१९२