पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिद्धीकडे (इ) ल कर्बुजीए (फ) स्वनिर्मिती (ग) व्यक्तिचित्रण (ह) इंग्रजी भाषांतर अशा आठ भागात विभागणे भाग पडले. या वैविध्यातूनही मजकूरविषयक आशय भिन्नता लक्षात येते. ते ग्रंथाचे एका अर्थाने वैभव वैचित्र्य होय. यातून ग्रंथास आपसूक एक शिल्पवैभव प्राप्त झाले असून ते अष्टकोनी झाल्याने अष्टपैलू ठरले आहे.

 “वास्तुपर्व' वाचताना प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लेखक म्हणून वास्तुशिल्पी मोहन वायचळ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना इतिहास, पुराण, परंपरा, कला, संस्कृतीची चांगली जाण आहे. स्थापत्यशास्त्र केवळ उभ्या आडव्या रेषांचे रेखाटन नाही. ती एक कलात्मक निर्मिती असल्याने आणि त्या निर्मितीचा संबंध मानवी जीवनाशी असल्याने संकल्पित वास्तू एखाद्या शिल्पासारखी हृद्य, संवेदी, सौंदर्यपूर्ण, आस्वादक, रसपूर्ण, रंगवैविध्य ल्यालेली शिवाय तिचं शरीरीरूप निसर्गासारखं नेत्रदीपकही हवं याचं त्यांना भान आहे. त्यामुळे त्यांचं लेखन तांत्रिक असलं तरी वरील जाणिवांतून झाल्याने ते वाचकांना एका नव्या जगात घेऊन जातं. वास्तुकलाविद म्हणून मोहन वायचळ स्थानिक असले तरी आपल्या क्षेत्राच्या विस्तारलेल्या वैश्विक क्षितिजाचा त्यांचा व्यासंग या लेखनास सार्वकालिक आणि सार्वत्रिक बनवतो. वास्तुविद्या पौर्वात्य आहे नि पाश्चात्त्यही! जगभरातील प्रभाव पाश्चात्त्य शैलीकडे झुकणारा आहे म्हणून ग्रंथातील समग्र लेखनात लेखक नवनवे मराठी शब्द योजतो व त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाकडे लक्ष वेधण्यासाठी कंसात इंग्रजी शब्द पुरवून आपले म्हणणे सर्वदूर पोहोचवतो.

 ‘वास्तुपर्व'चे लेखन सध्या प्रचलित झालेल्या वास्तुशास्त्राशी नाही, जे माणसास अंधश्रद्धेकडे घेऊन जाते. लेखनाची सारी बैठक वैज्ञानिक आहे शिवाय ती पुरोगामी आहे. वास्तुशिल्पशास्त्र हे एकाच वेळी विज्ञान, कला, काव्य, निसर्ग, संगीत, रंग, रस, आकारासह अव्यक्त व अलौकिक आनंदाचा नित्य शोध असल्याने त्यात कालानुषंगिक बदल, परिवर्तन न। उतरता ते आल्हादक असायला हवे. घर, कार्यालय, नगर, रस्ते, पूल, सार्वजनिक स्थळे सर्वत्र माणूस अल्पकालिक वा दीर्घकालीन रहिवास, विश्रांती, विरंगुळा, साधना करताना ती प्रत्येकाच्या गरजांना उतरणार नाही परंतु ‘अधिकस्य अधिकं फलम्' न्यायाने बहुसंख्याकांच्या समाधानास उतरली पाहिजे, हा वास्तुशिल्पी म्हणून मोहन वायचळांचा समग्र लेखनातून पाझरणारा दृष्टिकोण व्यापक व उदारमतवादीच म्हणायला हवा. पूर्वग्रहमुक्त लेखन म्हणूनही या ग्रंथाचे महत्त्व आहे. सारे लेखन इतिहास, परंपरेच्या

प्रशस्ती/१९१