पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रंजला, गांजलेला आहे. शिक्षकांचे त्यांच्या प्रती एक बांधील कर्तव्य आहे याची जाणीव देणारे पुस्तक नव्या काळातील शिक्षकांना समुपदेशक बनवील. तसे झाले तर आजचे शिक्षण अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया न राहता माणूस घडणीचा खटाटोप बनेल. तो तसा बनावा म्हणून संपतराव गायकवाडांनी सेवा-निवृत्त होताना हे चिंतन शिक्षण समाजापुढे मांडले आहे. त्यामागे मर्यादा व आव्हानांचे भान आहे. शासकीय सेवेत असताना यंत्रणा, व्यवस्थेची एक सक्तीची शिस्त असते. ती मोडली तर तो अधिकारी, कर्मचारी दंड, शिक्षेस पात्र ठरतो. पण त्यापेक्षा तो कावळ्यांच्या शाळेतला अस्पर्शित (खरे तर बहिष्कृत, उपेक्षापात्र) ठरतो. हे माहीत असल्याने त्यांनी हे लेखन सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येस प्रकाशित करण्याचे योजलेले दिसते. यातही शिस्तपालन, कर्तव्यपालन असा अनुकरणीय वस्तुपाठ आहे.

 संपतराव गायकवाड यांच्या या लेखनाचा वसा नि वारसा, कित्ता, धडा भविष्यकालीन शिक्षण अधिकारी, शिक्षक, पालक गिरवतील तर उद्याचे शिखण कायाकल्प होऊन अवतरेल. क्रांतीचे पाय सैतानाचे असतात. पण उत्क्रांतीच्या पाऊलखुणा शांत सीतेची न मिटणारी पावले असतात, हे सांगणारे लेखन केल्याबद्दल संपतरावांचे अभिनंदन! त्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य लाभो ही सदिच्छा!


◼◼


दि. ३0 जून, २०१५

प्रशस्ती/१८१