पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘तोत्तोचान'चं स्मरण देतो. या नि अशा अनेक प्रसंगातून हे पुस्तक शिक्षकांच्या घाण्याच्या बैलाच्या मळलेल्या वाटेचे सामाजिक वक्रीभवन करते नि पालकांच्या अहंकारी भूमिकेचे पृथक्करण! हीच या पुस्तकाची कमाई नि मिळकत .

 हे पुस्तक मला एक गोष्ट न सांगता शिकवते, ती म्हणजे वर्तमान शिक्षण व्यवस्था. आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत महत्त्व कुणाचे? तर ते शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकाचे. जो शिकवत नाही त्याला शिकवण्याचा काय अधिकार असा एक अव्यक्त प्रश्न या पुस्तकाच्या पानापानातून उमटतो असं मला जाणवलं. शिक्षणाधिकारी ‘साहेब' होणं आपल्या शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका आहे. तो मित्र, मार्गदर्शक, मदतनीस न होता प्रश्नकर्ता होतो, त्यामुळे शिक्षणात गुणवत्तावर्धन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाळेची तपासणी म्हणजे शिक्षण, अध्ययन, अध्यापनाचे मूल्यमापन (Evaluation) न होता साहेबांच्या बडदास्तीचं श्रेणीकरण (Gradetion) होऊन गेलं आहे. तपासणीची पूर्वतयारी मुख्याध्यापक करतात म्हणजे काय करतात? तर चहा, चिवडा, केळी, पेट्रोल, पाकिटांचा इंतजाम. ही गोष्ट आता काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे तपासणी पूर्ण झाल्यावर शिक्षणाधिकारी शिक्षकांना जे मार्गदर्शन करतात, जे शेरे लिहितात, जे अहवाल बनवतात, आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या ज्या शिफारसी करतात, त्याला नैतिक अधिष्ठान न राहिल्याने एक व्यर्थ कर्मकांड' किंवा 'निष्फळ कर्म' किंवा 'अनाठायी वाचाळता' असे त्याचे ओंगळ स्वरूप होऊन गेले आहे. सदर पुस्तक या सर्व भ्रष्ट व्यवस्थेवर क्ष किरण असून ती एक मूक समीक्षा होय. म्हणून मला या पुस्तकाचे शैक्षणिक मोल मुलखावेगळे वाटते. सेवांतर्गत प्रशिक्षण, सेवापूर्व प्रशिक्षणात शिक्षकाची घडण हा महत्त्वाचा गाभा घटक असतो. त्यासाठी हे पुस्तक पाठ्यपुस्तकाचे काम करते अशी वाचनानंतर झालेली माझी खात्री हेच या पुस्तकाचे यश होय. ‘मौन' सर्वांत बोलके शस्त्र असते. त्याचा संयमित वापर करू तर त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा ठरतो. हा अनुभव पाहता हे पुस्तक सर्व शिक्षक, पालकांनी असीम आस्थेने वाचून, रिचवून आचरले तर ती एकविसाव्या शतकातील संवेदी व मनुष्यकेंद्री शिक्षणाची पहाट ठरेल.

 जीवनात साच्याच बिया काही खडकावर पडत नसतात. एखादं बी सांदी कोप-यांत रुजतं. त्याचे रोप होतं. रोपाचा वृक्ष, वटवृक्ष होतो, हा आशावाद शिक्षण विकासाचे बलस्थान आहे. या प्रसंगातील अनेक शिक्षक मला अंधारातील कवडसे वाटले. भारतातला बहुसंख्य विद्यार्थी-पालक

प्रशस्ती/१८०