पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

चंद्रप्रकाशाच्या झळा (ललित लेखसंग्रह)
युवराज पाटील
अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - सप्टेंबर, २०१५
पृष्ठे - १00 किंमत -१४0/
__________________________________

चंद्रकलेला सरस्वतीचंद्रांचं तेज लाभावं

 ‘चंद्रप्रकाशाच्या झळा' हा युवराज पाटील यांनी लिहिलेल्या ललित लेखांचा संग्रह होय. 'ललित' शब्दाचा अर्थच मुळी आहे सुंदर, आल्हादक, आकर्षक, मनोहर. ज्याला जीवन सुंदर व्हावं वाटतं असाच माणूस ललित लेखन करतो. ललित लेखन येरागबाळ्याचे काम नाही. त्याला प्रतिभा असावी लागते. प्रतिभा म्हणजे वेगळी दृष्टी नि शब्दप्रभुता. ते सामर्थ्य तुमच्यात असेल, तर तुमचं लेखन कलात्मक बनतं. ललित हे साहित्याचं मूल्य आहे. साहित्यात लालित्य असेल तर ते अभिजात होण्याची शक्यता असते. ललित साहित्यात जीवन प्रतिबिंब असतं. कल्पनेचा स्वैर संचार व शब्द सौंदर्याची पखरण साहित्यास आल्हादक बनवते.
 मुळात माणूस साहित्य का वाचतो? तर त्याची अनेक उत्तरे देता येणं शक्य आहे. मनोरंजन, विरंगुळा, ज्ञान, माहिती, तत्त्व, तर्क, मन, जीवन कौशल्य साच्यासाठी माणूस साहित्य वाचत असतो. चंद्रप्रकाशाच्या झळा' या शीर्षकातच लालित्य भरलेलं तुम्हाला आढळेल. चंद्र हाच मुळी आल्हादक, आकर्षक, मनोहारी! त्याचा प्रकाश शांत, शीतल, रुपेरी! ज्याला चांदण्या रात्री नौका विहार करायला आवडणार नाही असा माणूस विरळा. पण झळा आणि शीतलता या परस्पर विरुद्ध अनुभूती होत. झळ अग्नीचे. ती होरपळते. पण झळीशिवाय जीवन थोडंच आल्हादक होतं!

प्रशस्ती/१७३