पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होत. लोकशाहीत प्रत्येकाचं महत्त्व असलं, तरी जनमत म्हणून आक्रमकही! जागतिकीकरण, माहिती आणि तंत्रज्ञान अर्थकारण यांच्या बदलत्या गणितामुळे माध्यमे प्रबोधक न राहता उत्पन्नाची साधने बनली. संपादकापेक्षा व्यवस्थापक मोठा ठरण्याच्या या काळात बातमीपेक्षा जाहिरात महत्त्वाची ठरली. त्यामुळे पेड न्यूजचा जमाना अवतरला. वृत्तपत्रे वाचन साधन न राहता ती दृश्य बनली. आज वर्तमानपत्र चहा पीत पाहण्याचा चाळा बनून राहणे यातच त्याचे अवमूल्यन सिद्ध होते. हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ‘ब्रेकिंग न्यूज

आणि २४ घंटे ७ दिवसच्या सातत्याचे अपत्य होय. स्पर्धेत ‘पळा पळा, पाहू कोण पुढे' च्या खटपटीत सुभाष धुमेंसारख्या कधी काळी ‘पाकीट'ऐवजी पुस्तक' भेट स्वीकारणारा पत्रकार म्हणजे वर्तमानात वस्तुसंग्रहालयातील “अँटिक पीस'. हे अधःपतीत शल्यही या पुस्तकात आहे. तरुण पत्रकारांना हा चौथा खांब' ढासळलेले काळाचे बुरुज डागडुजी करून किंवा नव्याने बांधून नवे गडकोट उभारत नव वृत्तपत्र सृष्टी उभारण्याचं स्वप्न, बळ, दृष्टी देतं. हेच या पुस्तकाचे श्रेय आणि प्रेय होय. वाचकांनी ते मुळातून वाचावं असा भरपूर खजिना, मसाला भरलेलं हे पुस्तक वृत्तपत्र सृष्टीतील हरलेल्या लढाया आणि हरवलेल्या मूल्यांच्या कथा सांगत परत एकदा ‘जागते रहो' चा पुकारा करत पत्रकारांना ‘गस्तवाला' बनवू इच्छितं.


◼◼


दि. २१ मार्च, २०१५
गुढीपाडवा

प्रशस्ती/१७२