पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सारखा नित्य सजग तरी चतुरस्त्र संपर्क ठेवून असणारा होता. आज पाच दशके उलटल्यानंतर लक्षात येतं की कधी काळी एकांडा लढणारा हा शिलेदार आज मनुष्यसंग्रही सेनापती बनून परिसरातील सर्व विधायक उपक्रमांचा पाठीराखा, मार्गदर्शक बनला आहे. पत्रकारांचा म्होरक्या। होण्यासाठी लागणारं बेरकेपण त्यांच्या अनुभवाची कमाई खरी पण ती ते अनुबोध, प्रबोधन, संघटन मार्गाने विधायकतेची एक एक वीट रचतो आहे.

 सन १९६० च्या दरम्यान दैनिक राष्ट्रप्रगती सारख्या छोट्या दैनिकात बातमीदार म्हणून सुरू झालेली त्यांची पत्रकारिता नोकरीतून औपचारिक निवृत्ती मिळवून ही ‘ब्युरो चीफ' म्हणून सुरू आहे. मधल्या काळात त्यांनी दैनिक सकाळ, पुढारी, केसरी, तरुण भारत अशा नामांकित दैनिकात । विभागीय बातमीदार म्हणून कार्य केलं. एखाद्या सैनिकास कायम युद्धभूमीवर राहणं भाग पडतं तसं सुभाष धुर्म कायम गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव ते थेट बेंगलोरपर्यंत नित्य बातमीचा शोध घेत भटकत राहिले. त्यांनी ज्या काळात बातमीदारी सुरू केली, त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन, संबंधितांशी बोलून घटनेची खातरजमा करून लिहिण्याचा, वार्ताकन करण्याचा तो काळ होता. लिहिलेली बातमी तातडीने पोहोचवण्याचं काम एस. टी. करायची. एस.टी. ने पाठवलेली बातमी दुस-या दिवशी वर्तमानपत्रात आली तर टपाल पोहोचलं समजायचं. बातमी आली नाही तर परत पाठवायची. कार्यक्रम, घटनांची छायाचित्रे वर्तमानपत्रात अपवादाने छापले जायचे. कारण छायाचित्रांचे ब्लॉक बनवणे आवश्यक असायचे ते । काम खर्चीक तर होतंच, पण वेळखाऊही होतं. वृत्तपत्रसृष्टी पेनाच्या शाईपेक्षा पत्रकाराच्या घाईवर चालते हे त्या वेळचं वास्तव होतं. फोनवर ट्रैककॉल करून बातमी देणं म्हणजे एक्सप्रेस न्यूज' व्हायची. ती ‘छापताछापता' सदरात ताजी बातमी म्हणून राहायची. बातमीला मूल्य होतं तसं बातमीदारालाही मोल होतं. पाकीट संस्कृती आली आणि ‘चौथा खांब ढासळला. हे पुस्तक बुरूज ढासळण्यापूर्वीच्या भुईकोट किल्ल्याचं आत्मकथन आहे. ते अनुभव कथन असल्यानं त्याचं अनुबोध (शिकवण) म्हणून महत्त्व आहे.

 ‘चौथा खांब' वाचत असताना वृत्तपत्र व्यवसायाची फारशी माहिती नसणाच्या माझ्यासारख्या वाचकांना हा 'मॅजिक लँटर्न' वाटला तर आश्चर्य वाटायला नको. लोकशाहीत संसद, न्यायालय, प्रशासन व प्रसार माध्यमे ही अनुक्रमे कायदा, न्याय, व्यवस्थापन व प्रबोधनात्मक नियंत्रक स्तंभ

प्रशस्ती/१७१