पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महती हे कथासाहित्य दैववाद, जातिभेद, अंधश्रद्धांचा निरास करणारे आहे म्हणून अधिक आहे. स्त्री आणि पुरुष' सारख्या कथासंग्रहातील कथांतून खांडेकर स्त्रीचं स्वरूप, प्रश्न, समस्या, मनःस्थिती, सामाजिक स्थान यांची चिकित्सा ज्या प्रगल्भ मनाने व विश्व साहित्याचे संदर्भ देत करतात त्यातून खांडेकरांचे मूल्यभान भारतीय परिप्रेक्ष्याचं असलं तरी त्याला वैश्विक पाश्र्वभूमी आणि अभ्यासाची जोड आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा स्त्री संदर्भातील खांडेकरांची प्रगल्भता अधिक अंतर्मुख करते. नवी स्त्री' सारखी कादंबरी याचं उदाहरण म्हणून सांगता येईल.
 ओस्वालु श्वार्झचं एक पुस्तक आहे. The psychology of sex नावाचं. त्यात 'Differential psychology of sexes' नावाचं प्रकरण आहे. खांडेकर ते वाचतात आणि त्यांची अशी धारणा तयार होते की पुरुषापेक्षा स्त्री कितीतरी निराळी आहे. संघर्ष, द्वंद्व तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न घटक आहे. तिला पुरुषाप्रमाणे बुद्धी असते. पण पुरुषात नसलेलं तिच्यातलं गर्भाशय तिला व्यवच्छेदक द्वंद्वाचं वरदान देतं. त्यातून तिच्यात दुहेरी निष्ठा तयार होते. ती निसर्गाची योजनाच असते. स्त्री एकाच वेळी आई, पत्नी, प्रेयसी, सखी, भगिनी राहू शकते ती अतिरिक्त निसर्ग क्षमतांमुळे! ही खांडेकरीय पठडीची चिकित्सा वाचन व अभ्यासावर आधारित भले असो; पण कथाकार म्हणून खांडेकरांना ती स्त्रीवादी ठरवते आणि आधुनिक बनवते तसेच स्त्रीविषयक नवमूल्यांचा, द्रष्टा, सर्जकही बनवते.

 “मूल्यांचा प्रश्न भारताच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. एक प्रकारे तो आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा कणा आहे. काळाबरोबर पुष्कळ मूल्यांचे स्वरूप बदलते, हे खरे आहे. प्राचीन काळी धर्मनिष्ठा हे।

आपले सर्वांत मोठे मूल्य होते. गेल्या शे-दीडशे वर्षांत राष्ट्रनिष्ठेने त्याची जागा घेतली. पण या दोन्ही निष्ठांच्या मागे जो मनाचा कणखरपणा होता, जी सर्वस्वाच्या त्यागाची वृत्ती होती, माणूस म्हणजे नुसते खातेपिते शरीर नव्हे, ही जी तीव्र जाणीव होती, ती एकाच जातीची, एकाच प्रकारची होती. जुन्या धर्मनिष्ठेचे रूपांतर नव्या राष्ट्रनिष्ठेत झाले व ही नवी निष्ठा स्वातंत्र्याच्या लढ्याच्या रूपाने प्रकट झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या । राष्ट्रनिष्ठेचे पुन्हा विशाल समाजनिष्ठेत रूपांतर व्हायला हवे होते. पण या नव्या अपूर्व सामाजिक निष्ठेला आवश्यक असलेली बौद्धिक आणि भावनात्मक पूर्वतयारी आपल्या समाजाने कधीच केली नव्हती. 'प्रसाद' कथासंग्रहाच्या प्रस्तावनेतील (पृ. २२३) ही खांडेकरीय मूल्य चिकित्सा

प्रशस्ती/१५४