पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. ते शिक्षक असल्याने आपल्या परिसरातील समाजात ते विविध निमित्ताने जात-येत असल्याने परिसरातील प्रश्न व समस्यांचे त्यांचे निरीक्षण व आकलन सम्यक आहे, त्यामुळे प्रत्येक कथा नवी समस्या मांडते. काही कथा प्रसंगांनी निर्माण झाल्यात तर काही त्यांनी विचारपूर्वक लिहिल्यात. ज्या निर्माण झाल्यात त्या प्रभावी होणे स्वाभाविकच. ज्या लिहिल्या गेल्या त्या हेतुप्रधान असल्याने बोधप्रद असल्या, तरी कलात्मक होऊ शकल्या नाहीत. सर्व कथात चंद्रकांत खामकर यांची वर्णन शैली अफलातून आहे. त्यांच्या मुळात त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं. कथांची भाषा बोलीमय, गावभाषा राहिल्याने कथा वाचनीय झाल्यात. ‘हनिमून' सारखी कथा शैलीच्या अंगाने विनोदी असली तरी ग्रामीण भागातील माणसाचं त्यातून प्रकट होणारं अज्ञान मात्र करुण होतं. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर हा राजकीय शापामुळे गरीब राहिला तसा तो अज्ञानी, व्यसनाधीनही झाला हे शल्य कथाकारांनी विविध कथाप्रसंगांतून चित्रित केलं. ते वाचकास अस्वस्थ करतं.

 ‘कळ' मधील आरंभिक कथा 'न्याय' स्त्री अत्याचाराला वाचा फोडणारी व स्त्रीशक्ती जागृतीची कथा म्हणून विषय व आशय दोन्ही अंगांनी समकालीन आहे. कथानायक संता गरीब शेतकरी आहे. नंदा त्याची पत्नी. दोघं काबाडकष्ट करून जीवन कंठत असतात. त्यांना सागर व शुभांगी ही। दोन अपत्य असतात. शुभांगी दहावी पास होते. तिला पुढं शिकायची इच्छा. पण आईचा मुलगी म्हणून काळजीने विरोध असतो. शिवाय शिकायला रोज बसनं परगावी निपाणीला जावं लागणार असतं. मुलीच्या हट्टापुढे दोघे हात टेकतात. शुभांगी कॉलेजला एस.टी.ने जाऊन येऊन असते. प्रवासात कॉलेजची मुलं छळत असतात. एकदा साळुख्याचा परश्या तिला मुद्दाम धक्का देतो. रागाच्या भरात ती त्याच्या कानाखाली आवाज काढते. बदला म्हणून तो मित्रांसह तिच्यावर बलात्कार करतो. गावातील महिला शकुंतला पाटील या महिला कार्यकर्तीच्या जागृती व संघटनेमुळे परश्याच्या घरावर मोर्चा काढून जाब विचारतात. घरचे दाद देत नाहीत म्हणून महिला पोलिसांत तक्रार करतात. पोलीस निरीक्षक न्याय दिल्याशिवाय खुर्चीवर न बसायची प्रतिज्ञा करतो, असं कथानक घेऊन येणारी ही कथा. तशी ती प्रातिनिधिक कथा होय. वर्तमान वाढती स्त्री जागृती ही या कथेची प्रेरणा. कलात्मकदृष्ट्या सामान्य असली तरी लेखकानं वर्णन कौशल्यावर ती जिवंत केली आहे.

 ‘इलेक्शन' शीर्षकाप्रमाणेच राजकीय कथा होय. वर्तमान राजकीय

प्रशस्ती/१४६