पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘ओपन डे' ला काय करायचं याचे मार्गदर्शन पाहता येईल. मुलांच्या वाढीनुरूप त्यांच्या मनोभूमिका भावविश्व बदलतं. त्या अनुषंगाने पालकांची भूमिका बदलणं महत्त्वाचं. चांगल्या सवयी जडायच्या तर पालकांनी प्रथम त्या आत्मसात करायला हव्यात. ‘दुसन्यास सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' यातून विसंगतीच जन्मणार, शिवाय हाती काहीच लागणार नाही ही या पुस्तकातील शिकवण अधिक प्रगल्भ करते.

 ‘सवयी नक्की येतात कुठून?' याची जिज्ञासा पालकांच्या मनात असते. यज्ञिता राऊत यांनी समजावलं आहे की त्या काही उपजत असतात, काही संपर्कातील नातेवाइकांतून, कुटुंबातून येतात तशा इतरांकडून, समाजातूनही लागतात. एखादी गोष्ट नियमित करण्यातून सवय झडते, घडते. त्याला कधी पूर्वविचार असतो, कधी नसतो, एखाद्या गोष्टीची सवय झाली की तिचं रूपांतर वृत्ती, प्रवृत्तीत होतं. सवयी अनेक प्रकारच्या असतात. चांगल्या, वाईट, नियमित, अनियमित कधी-कधी त्या प्रासंगिकही असतात. म्हणून त्या जीवनाला कलाटणी देणाच्या ठरतात. सवयी सहजस्फूर्त असतात तर कधी व्यक्ती, क्रिया, वस्तूच्या निरंतरतेतून आकारतात. पुनरावृत्ती, वारंवारिता इत्यादीमुळे सवयी दृढ होतात. दृढ सवयी मोडणे म्हणजे तिच्या जागी नवी सवय रुजवणे, पर्याय देणे वा कधी अवकाश (space) निर्माण करणेही असते. हेतुपूर्वक संस्कार, सवयी घडवणे हे संयम व सातत्याने शक्य होते. पालकांसाठी ते कष्टसाध्य तर कधी जीवघेणेही होते. चांगल्या सवयी अनुकरणातून येणे इष्ट. वाईट सवय संगतीतून वा उपजत प्रेरणेतून जन्मते. ती जितक्या कोवळ्या अवस्थेत बदलाल, ती लवकर बदलते. वाईट सवयीचं रूपांतर सद्गुण, सत्प्रवृत्तीत होतं. सवय घडणीत प्रेरक, प्रबलकांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात. पालकांना सवयीच्या उगमाचा स्रोत समजणे महत्त्वाचे असते. सवयीचं प्रगटीकरण होऊ लागलं की त्या लक्षात येतात. त्यामुळे पालक सजग, निरीक्षक आहे. मुलांच्या उमलत्या, कळत्या वयात पालकांची भूमिका ‘रात्र वैच्याची, जागे रहा' अशी हवी. संशय हवा पण त्याचे प्रदर्शन असता कामा नये. संशयामागची भूमिका विधायक हवी. त्यात काळजी हवी. पाल्यावर दोषारोप नको. आपली संशयी वृत्ती पाल्यांना अपराधी बनवते हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. सवयी बदलायच्या तर संवाद, समज, समुपदेशन हवं. शिक्षा, धमकी, राग, मार, नकार जन्माला घालतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. बोलण्याबरोबर पाल्याचं ऐकायलाही हवं. त्याची बाजू, पक्ष, मत यांचा आदर होईल तर परिणाम लवकर दिसतील. पालक मालक

प्रशस्ती/१४२