पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोककलावंत आपल्या लोकनाट्यात, प्रबोधन उपक्रमात सादर करून समाज प्रबोधनात मोठी आघाडी मिळवू शकतील. म्हणून यांचं मोल केवळ शालेय परीघ न राहता ते समाज व्यापक होतं, हे या नाट्यछटा संग्रहाचं खरं योगदान होय. या नाट्यछटातून सुरेश जत्राटकर यांनी विद्यार्थ्यांतील बेशिस्त, व्यसनाचे दुष्परिणाम, प्रदूषण, पर्यावरण रक्षण, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, वाहतूक नियमांचे पालन, पालकांचे कष्ट, गणपती दूध पितो इ. अनेक विषय हाताळून या नाट्यछटांना मूल्य शिक्षण व प्रबोधनाचे प्रभावी साधन बनवले आहे. या नाट्यछटा प्रारंभीच संबोधनातून प्रेक्षकांना आपणाकडे आकर्षित करतात. मध्यावर विषय विस्तार येतो. शेवटी या निष्कर्षाप्रत पोहोचतात. त्यामुळे या नाट्यछटांची सगळी किमया तिची भाषा, संवाद कौशल्य, कल्पना चमत्कार, अभिनय सामर्थ्य, श्रोते, प्रेक्षक, वाचकांशी हितगुज करण्याची हातोटी, प्रश्न विचारून त्यांना आपल्या नाट्याचं अंग बनवणं अशा बहुविध गुणात सामावलेली आहे. या नाट्यछटा मुळातूनच वाचायला हव्यात. त्यात जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण करणारा ऊहापोह आहे. ‘सब मर्ज की दवा’, ‘गागर में सागर' असं समाज संचित बनलेल्या या नाट्यछटा शिक्षण व समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात मूल्य व संस्कार दोन्ही एकाच वेळी रुजवतात. या नाट्यछटा प्रत्येक शाळेत सादर होतील तर उद्याचे नागरिक सुजाण होतील. या नाट्यछटा खेड्यापाड्यातील पारावर सादर होतील तर अडाणी समाज शिक्षित व जबाबदार होईल. ‘उगवतीच्या नाट्यछटा' शैक्षणिक, सामाजिक दोन्ही अंगांनी महत्त्वाच्या आहेत. हे कार्य केल्याबद्दल सुरेश जत्राटकर अभिनंदन व प्रशंसेस पात्र आहेत. त्यांच्या या नाट्यछटांना यापूर्वी अनेक पारितोषिके लाभली. उद्या या संग्रहास साहित्य पुरस्कार मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

▄ ▄

दि. २ जानेवारी, २०१३

प्रशस्ती/१३८