पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संवाद म्हणजे नाट्यछटा. तिचा उद्देश विसंगतीवर बोट ठेवून ती दूर करणे असतो. नाट्यछटेत एकच पात्र अनेक काल्पनिक पात्रं संवादातून निर्मून नाट्याचा आभास निर्माण करते व प्रेक्षकांना खिळवून ठेवते. नाट्यछटाकार आपल्या या छोट्या एकपात्री नाटिकेतून एका विषयाचे सर्व पैलू, बाजू आपणासमोर ठेवत असल्याने वाचक वा प्रेक्षक त्या विषयासंबंधी विचार विनिमयात विचाराच्या पातळीवर सहभागी होत असतात. शिक्षणात शिकवणारा एक व शिकणारे अनेक तसेच नाट्यछटेचेही असते. शिक्षण सहसंवाद असतो तशी नाट्यछटाही म्हणून यात सारे सहभागी, सक्रिय होतात व त्याचा परिणाम सामूहिक असतो. गती, उत्साह, हर्ष, शोक, आश्चर्य, आनंद सा-याची यात सरमिसळ असते. इंग्रजीत रॉबर्ट ब्राऊनिंगनी नाट्यगीतांच्या रूपात याचे सादरीकरण केले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांनी दैनिक केसरीत प्रथमतः नाट्यछटा लिहिली. वि. स. खांडेकरांनी 'दिवाकरांच्या नाट्यछटा' संपादित करून मराठीत तिची मोहर उठविण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.,

 सुरेश जत्राटकरांचा नाट्यछटा संग्रह ‘उगवतीच्या नाट्यछटा'वरील पार्श्वभूमीवर पाहता ते मराठी साहित्यातील नष्टप्राय झालेल्या अप्रचलित साहित्य प्रकाराचे पुनरुज्जीवन होय. जत्राटकर हे कोल्हापूरच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचे शिक्षक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ गेली अनेक वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्यस्पर्धा योजत असते. दरवर्षी नवनव्या विषयांवर नाटक, एकांकिका, अभिनेते, विद्यार्थीच श्रोते, पालक नेपथ्यकार, शिक्षकेतर कर्मचारी संगीतकार, मुख्याध्यापक मार्गदर्शक असा संच असतो. दरवर्षी रंगणारा हा शालेय नाट्य महोत्सवच असतो. ‘उगवतीच्या नाट्यछटा' या नाट्यमहोत्सवाचंच अपत्य म्हणावं लागेल. सुरेश जत्राटकरांनी सन २000 पासून आजअखेर लिहिलेल्या ४३ नाट्यछटा या संग्रहात आहेत. ही एका तपाची नाट्यसाधना होय. ते लेखक, सहकारी दिग्दर्शक व विद्यार्थी अभिनेते. प्रत्येक नाट्यछटेखाली श्रेयनामावली, रचनाकाल इ. तपशील देऊन या नाट्यछटांचा संदर्भ व इतिहास मूल्य त्यांनी जपलं आहे.

 ‘उगवतीच्या नाट्यछटा' वाचत असताना लक्षात येतं की त्यांचे विषय समकालीन आहेत. त्यांची भाषा ग्रामीण बोली आहे. आपणाला कुणाचं प्रबोधन करायचं आहे त्या अशिक्षित समाजाची भाषा ते हटकून वापरतात. या नाट्यछटा प्रायोगिक स्तरावर शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांसमोर सादर करत गेले असले, तरी उद्या या नाट्यछटा प्रकाशित झाल्यावर

प्रशस्ती/१३७