पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आविष्कारच. भूगोलाचा पेपर असताना मुलं वेंधळेपणाने इतिहासाचा अभ्यास करून जातात. मग जे होतं ते सारं या कवितेत उतरलंय! या कवितेत शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रमावर पण सूचक भाष्य आहे. ते या कवयित्रीची बालवयातील प्रगल्भतेची चुणूक दाखवतं. तिला इतिहासाची विशेष आवड दिसते. कारण तिच्या कवितेत गड, किल्ले, बुरूज, छत्रपती शिवाजी महाराज सारे येतात नि हजेरी लावून जातात. संविधान, स्वातंत्र्य संग्राम असे अवघड विषय ही कवयित्री हाताळते. त्यावरून तिचं अष्टावधान लक्षात येतं. आयुष्यावर बोलू काही' वाचताना ती अकाली प्रौढ झाल्याचे जाणवते. 'आई' हा तिचा हळवा कोपरा आहे. जीवन, शाळा, नातीगोती यावर तिचं प्रेम आहे. 'घर' तिला आवडतं. ‘स्वप्नं रंगवायची नसतात तर ती पूर्ण करायची असतात याचं भान समृद्धीस बालपणीच आलेलं असल्यानं ती मोठेपणी नक्की कोणीतरी होणार याची खात्री पटते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी' हे तिचं करुण कथात्मक काव्य वाचताना डोळे पाणावतात.

 प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर इथं आठवी इयत्तेत शिकणाच्या बाल कवयित्री समृद्धी कुलकर्णीला तिचे शिक्षक, आई-बाबा सर्वांचं प्रोत्साहन मिळाल्याने तिच्या प्रतिभेचं हे देणं आपल्यासमोर येत आहे. बालवयात प्रोत्साहन मिळालं तर स्वप्नांची फुले होतात. अन्यथा, साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे ‘सुंदरशा कळ्या किडीच खाऊन टाकतात. असं घडल्यामुळे अनेक कलावंत जन्मण्यापूर्वीच कोमेजतात. समृद्धीला प्रोत्साहन बळ लाभल्यानं ती या कविता संग्रहाच्या रूपाने प्रकाशात आली. वाचक तिला प्रसिद्धी देतील. तिची काव्य प्रतिभा रोज फुलत राहील.

▄ ▄

दि. १ जानेवारी, २०१३
नववर्ष दिन!

प्रशस्ती/१३२