पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मार्गदर्शक पुस्तक बनतं. पण 'गाइड' नाही. असेलच तर शैक्षणिक वास्तवाचं भान देणारं भाष्य!

 आज शिक्षकांचं शिक्षण (टीचर्स एज्युकेशन) लिलाव पद्धतीनं सुरू आहे. शिक्षण संस्थांना मान्यता देणारी एनसीटीई, भोपाळ सारखी संस्था पैसे घेऊन डी.एड., बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड. कॉलेजिसना मान्यता देते म्हणून बंद करण्यात आली. अशा पद्धतीने सुरू होणा-या विनाअनुदानित शिक्षण संस्था प्रवेशाचा बाजार मांडतात. दर्जा नसलेल्या अशा शिक्षण संस्थांतून गुणवान शिक्षक कसे बाहेर पडणार? जे पडतात त्यांना नोकरीसाठी लाखो रुपये संस्थांना देणगी म्हणून द्यावी लागते. अशा परिस्थितीत ना शिक्षणाचा दर्जा ना शिक्षकांचा. हे भीषण विदारक चित्र उभं करणारं हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करतं.

 एके काळी शिक्षकाचं जीवन समाज, पालक व विद्यार्थी यांच्या दयेवर पोसलं जायचं. काळ बदलला. पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाने शिक्षकांचे आर्थिक जीवन समृद्ध केलं. त्यातून शिक्षकांच्या पतसंस्था उभारल्या. त्या समृद्ध स्थिर झाल्या. त्यातून होणारं शिक्षकांचं राजकारण, चारित्रिक अधःपतन इ. वर यातील लेखात कोरडे ओढण्यात आले आहेत. ‘आपल्याकडेही चार बोटे' सारख्या लेखातून लेखक शिक्षकांना अंतर्मुख करू पाहतो. यात त्याचा विवेक लक्षात येतो. शिक्षकांची गुणवत्ता वाढवायची असेल तर राजकीय इच्छाशक्ती असावी लागते हे अनुभवाचे बोल या पुस्तकातून उमटताना दिसतात.

 हे आणि असेच पंचवीस लेख या पुस्तकात आहेत. त्यात एकीकडे चांगल्याला प्रतिसाद आहे तर दुसरीकडे वाईटाचा विरोध. समाज विकास प्रतिसाद व प्रतिक्रियेच्या द्वंद्वातून नव्या विचारांना जन्म देत असतो. एकविसावे शतक हे बदल व विकासाच्या दृष्टीने अत्यंत गतिमान काळाचे आहे. हे लेख सन १९९० नंतरच्या काळातले होत. त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरण या समाजवाद विरोधी तत्व व व्यवहारांची फलनिष्पत्ती म्हणून येणा-या नव्या समाज व्यवस्थेकडे डोळसपणे पहात येणा-या बदलांना हाक देणारं हे पुस्तक शिक्षणाशी संबंध असलेल्या प्रत्येकाने वाचायला हवं. शिक्षक, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षण अधिकारी, संघटना कार्यकर्ते, पालक, राजकीय निर्णायक अशा सर्वांनी वाचावे असेच आहे.

▄ ▄


दि. १४ जानेवारी, २०१३

प्रशस्ती/१३०