Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नि अभिनेते आहेत. अभिनयाची जाण असलेला त्यांच्यासारखा कलाकार जेव्हा 'मत्सर', 'पाउले चालती दुसऱ्याची वाट' व 'आक्रंदन' सारख्या एकांकिका लिहितो तेव्हा त्याच्या मानसिक रंगपटावर त्या अभिनित होतच साकारत असतात. त्यामुळे रंगमंचाच्या कसोटीवर त्या यशस्वी करण्यासाठी त्यांना वेगळे प्रयास घ्यावे लागत नाही. माझ्या दृष्टीने या एकांकिकांचा हा यशमय जन्म ही भावी यशस्वीतेची नांदी ठरत आला आहे. 'सुगंधी काटे' मधील या तीनही एकांकिका विषयाच्या दृष्टीने सामाजिक आहेत. 'मत्सर' एकांकिका मानवी मनाच्या भावविश्वाचे व विचार संघर्षाचे चित्रण करते. मत्सर हा स्त्री गुणविशेष मानला जातो. पण तो खरा तर स्त्री इतकाच पुरुषातही प्रभावीपणे विद्यमान असतो. प्रसंगोपात तो स्त्री इतकाच प्रक्षोभक रूपात प्रकट होतो. हे सांगणारी एकांकिका प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीस खिळवून ठेवेल यात शंका नाही. 'पाऊले चालती' माणसाच्या अंधानुकरण वृत्तीतून येणाऱ्या वैफल्याचे चित्रण करणारी एकांकिका. अंधानुकरणामुळे माणसाचे वर्तन विदुषकी होते. परिणामी येणारी हताशा वाचकास अंतर्मुखी करते. ती इतक्या माफक आशेनेच पाहायला हवी. कारण तिची प्रयोगक्षमता तशी माफकच म्हणावी लागेल. 'आक्रंदन' मात्र खऱ्या अर्थाने रंगमंचीय एकांकिका. प्रक्षोभक विषय, समकालीन संघर्ष, संवादातील जहालता, नाटकीयता सारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे ही वाचकांबरोबर प्रेक्षकांनाही आवडावी.
या संग्रहातील एकांकिका सामाजिक जाणिवेतून लिहिल्या गेल्या असल्याने त्यांचे सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने आगळे महत्त्व आहे. या एकांकिका वाचत असताना त्यांच्या मागील सहेतुकता पदोपदी जाणवते. एका विवक्षित उद्देशाने खरे तर उद्देश समोर ठेवूनच त्यांचे लेखन झाल्याने त्या उद्बोधन प्रधान झाल्या आहेत. एकांकिका संकलनाच्या मागे असलेल्या 'नम्र निवेदनातून' ही एकांकिकाराची सामाजिक तळमळ स्पष्ट होते. या एकांकिकांच्या प्रयोगांचे मानधन अनाथ, अपंग, अंध इ. चे संगोपन, पुनर्वसन करणाऱ्या सामाजिक संस्थांना द्यायच्या प्रयोजनामागे हीच जाण आहे. नाटककाराच्या पहिल्या धारेच्या या एकांकिकांना कलात्मकतेच्या कठीण कसोट्यावर कसणे क्रूरता होईल. परंतु त्यातील रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, चमत्कृतीपूर्ण दृश्य (ट्रिक सीन), संक्षिप्त संवाद इ. दृष्टीने लेखकाचे बारीक लक्ष वाखाणण्यासारखे आहे.
 पुस्तकारंभी लिहिलेल्या अशा प्रस्तावना बहुधा प्रशंसापत्रच असते. प्रशंसापत्राचे एक बरे असते. ते लिहिणाऱ्याला व ज्याच्यासाठी ते लिहिले

प्रशस्ती/१२