पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालमजूर, दुभंगलेल्या कुटुंबातील, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, कुमारी मातांची संकटग्रस्त मुलं, एड्सग्रस्त, धरणग्रस्त, सेझग्रस्त, रस्ता विकास प्रकल्पग्रस्त दहशतवादाचे बळी, नक्षलग्रस्त व युद्धग्रस्त सीमांत प्रदेशातील मुलं अशी दोन कोटी आणखी मुले अनाथांचं जिणं जगत आहेत. अनाथाश्रम, रिमांड होम, विशेषगृहे, आश्रमशाळा इ. मधून राहणारी मुले हजारांच्याच घरात आहेत. बाकीच्या कोट्यवधी मुलांचे काय? संस्थातील मुलांची स्थिती पुअर होम मधल्या ऑलिव्हर विस्टपेक्षा वेगळी नाही. २00 वर्षे उलटून गेली तरी प्रा. सुभाष विभूते यांनी या सर्व वास्तवातून आलेल्या अस्वस्थतेतून ‘नाथा' या ऑलिव्हर विस्टचा पुनर्जन्म घडवून आणला आहे. नाथा जन्मालाच येणार नाही असा समाज निर्माण करण्याचे शिवधनुष्य, त्यांनी आपणापुढे ठेवले आहे. आपण सर्व मिळून ते उचलू या. प्रत्येक नाथा सनाथ करू या! All is well, that's end well!!

दि. ३० नोव्हेंबर, २०१२

प्रशस्ती/१२६