पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणजे या आत्मचरित्रात स्वतःवर अनेकदा विनोद केलेले आढळतात. स्वतःवर विनोद करता येणं ही आयुष्य जगण्याची वरची कला होय.

 डॉक्टरांचा नि माझा परिचय गेल्या १५-२० वर्षातला. मी पूर्वी अनाथ, निराधार, मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन क्षेत्रात काम करायचो. तेव्हा तेरेदेस होम्स नावाची एक जर्मन संस्था महाराष्ट्रातल्या निवडक नि गरजू संस्थांना अर्थसाहाय्य करायची. त्या संस्था सचोटीनं काम करायच्या नि तिथले कार्यकर्ते समर्पित असायचे. अशांचं संयुक्त संमेलन, प्रशिक्षण असायचं. त्या निमित्ताने साहाय्य मिळविणाच्या संस्थांचे कार्यकर्ते एकत्र येत. अनुभवांची देवाणघेवाण व्हायची. अशा एका प्रशिक्षणात आधाराश्रमाचे नाना उपाध्ये आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात आले होते. तेव्हा प्रथम ही संस्था मला समजली. मग मी त्यांच्या दत्तक पालक मेळाव्यात उद्घाटक म्हणून गेलो. संस्था पाहिली व आमचे संस्थात्मक ऋणानुबंध प्रथम निर्माण झाले. त्याचे रूपांतर व्यक्तिगत मैत्रीत झाले. ही परंपरा डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी नुसती टिकवली नाही तर वाढविली... समृद्ध केली.

 ‘गोष्ट सुखी माणसाची' हे आत्मचरित्र डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे व्यक्तिगत व सामाजिक जीवन निखळपणे व्यक्त करते. आपल्या आई, वडील, पत्नी, मुले, सुना, नातवंडे सर्वांबद्दल त्यांनी जे लिहिलं ते आडपडदा न बाळगता व हतचाही न ठेवता. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा माणूस आत-बाहेर एक असतो. अद्वैत व्यक्तिमत्त्व समाजात आढळणारी दुर्मीळ गोष्ट होय. ती डॉ. पूर्णपात्रे यांच्या ठायी आहे. ते अष्टपैलू आहेत. डॉक्टर व्यवसायातील त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते अनेक कुटुंबांचे ‘फॅमिली डॉक्टर' झाले. त्याचे पेशंट सर्व थरातील. यातून माणसाचा सर्वांप्रती समभाव दिसून येतो. डॉ. पूर्णपात्रे पेशंटसाठी २४ तास उपलब्ध असायचे. त्यांचा फोन कधी ‘स्विच्ड ऑफ' असत नाही ही आख्यायिकेसारखी वाटणारी गोष्ट वस्तुस्थिती असणं यातच त्यांची सेवापरायणता सिद्ध होते. ते कुशल संघटक होत. आधाराश्रमक फिजिशियन्स असोसिएशन, लायन्स क्लब, मेडिकल असोसिएशन साच्या संस्थातलं त्यांचं अजातशत्रू नेतृत्व त्यांच्या निरपेक्षतेतून आल्याचं आढळतं. कुशल सूत्रधार, वक्ते, लेखक अशा चतुरस्र पद्धतीने ते जीवनाचा आस्वाद घेताना दिसतात.ही जिंदादिली त्यांची खरी वृत्ती, आतला आवाज! मीनाकुमारी काळाच्या पडद्याआड गेली म्हणून त्या दिवशी ‘ठंडी चाय' (दारू)पिणारा माणूस खरा संवेदनशील!पत्नी प्राप्तीच्या दिव्यातही ती प्रतिबिंबित! आपल्याला दोन मुलं म्हणून

प्रशस्ती/११९