पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चेन्नई घोषणापत्र(वैचारिक)
साप्ताहिक आरडंट व्ह्यू,कोल्हापूर,
पृष्ठ ३२ किंमत २0/




३१.शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा मूलमंत्र

 शिक्षणाचे व्यापारीकरण रोखणे आणि नव्या समान शालेय शिक्षण पद्धतीची निर्मिती करण्यासाठी ‘अखिल भारतीय शिक्षण हक्क मंच'तर्फे ३० जून व १ जुलै, २०१२ या दोन दिवशी वलुवरकोट्टम, नंगमबक्कम, चेन्नई (तमिळनाडू) येथे विविध जात-धर्मीय बांधव, विधिज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, लेखक, पत्रकार, कलाकार, शिक्षक संघटना, शिक्षण संस्था यांची ‘अखिल भारतीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत जो विचारविनिमय झाला, जे ठराव झाले त्याचे एक घोषणापत्र तयार करून ते परिषदेत स्वीकृत करण्यात आले. ते 'चेन्नई’ घोषणापत्र नावाने सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके, माध्यमे इ. द्वारे प्रसृत करण्यात आले होते. ते मराठीत सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध करून त्याचा व्यापक प्रचार, प्रसार व्हावा म्हणून या पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशित केल्याबद्दल शिक्षक समितीस धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे.

 शिक्षण ही सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रिया होय. शिक्षणातूनच न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आदी मूल्यांची रुजवण होत असते. म्हणून भारतीय राज्यघटनेने भारतातील सर्वसामान्य नागरिकास सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क दिला.

प्रशस्ती/११४