पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जुन्या आकरावीचे म्हणजे शालान्त वर्ष. १९७२ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याप्रमाणे या काळात त्यांनी आपले अनेक स्वकीय, आत्मीय परिजन गमावले. विशेषतः बाईचं जाणं (आई) धक्कादायक होतं. स्त्री नसलेलं घर, बांगड्यांचा आवाज नसलेलं माजघर काय असतं ते दिवाळीसारख्या सणांना प्रकर्षानं लक्षात येतं. दिवाळीचे या दैनंदिनीतील दिवस वाचकांचे डोळे पाणावतात. वडिलांना पगार दोन रुपये. गुरुजींची शिकवणी ३ रुपये. म्हणून ती न घेणा-या भागवतवर गुरुजी जे कोरडे ओढतात, ते वाचले की वाटतं अशी वेळ कुणावर येऊ नये. रोज मक्याची भाकरी खाणारं त्याचं कुटुंब. त्याला गव्हाची पोळी मिळणं म्हणजे मिष्टान्न वाटावं यावरून भागवतची आर्थिक स्थिती लक्षात येते. अशा परिस्थितीतही तो ५८% गुण मिळवतो. संपन्न घरातील मुलाने ५८% मिळवणे व भागवतने ५८% मिळवणे यात अंतर आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

 ‘अकरावीचे दिवस' ही दैनंदिनी भागवत माळी यांनी विद्यार्थी दशेत लिहिली असल्याने त्याचे मूल्यमापन साहित्यिक निकषांवर करणे चुकीचे ठरेल. परंतु त्याला शाळकरी दैनंदिनी म्हणून तिची उपेक्षा करणे अन्यायकारक होईल. या दैनंदिनीचे सामाजिक महत्त्व आहे. तीत काळ जिवंत करण्याची ताकद आहे. त्यातील समाज चित्रण, पात्रे, मनुष्य व्यवहार, प्रसंग इ. इतकं बोलकं आहे की ते चित्र म्हणून उभं राहतं. घर, परंपरा, नातेवाईक, मित्रसंबंध, विद्यार्थी-शिक्षक संवाद व संबंध, प्रसंगातून माणसाचं शिकणं इ. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारं हे लेखन कालचित्र व चरित्र बनून पुढे येतं.

 मराठी साहित्यात ‘दैनंदिनी' हा साहित्य प्रकार फार रूढ नसला तरी अनेक राजकीय नेत्यांच्या दैनंदिनींना इतिहासापेक्षा कमी महत्त्व नाही. महात्मा गांधी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण यांच्या दैनंदिनी कोण विसरेल? साने गुरुजींच्या हस्तलिखित दैनंदिनी मी वाचल्या-मिळवल्या आहेत. इंग्रजी साहित्यात त्याचे उत्कृष्ट नमुने आढळतात. त्यांचे कलात्मक सौंदर्य असते. यात भागवत माळी यांनी पत्र, कविता, सुभाषितांचा वापर करून ही दैनंदिनी वाचनीय केली आहे.

 अल्पवयीन लेखन असूनही दैनंदिनीचा बाज मात्र प्रगल्भ केला आहे.

▄ ▄

दि. ४ जुलै, २०११

प्रशस्ती/११३