पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 होता, तो संघटित झाल्याने स्वातंत्र्योत्तर काळात त्याची मिळकत व जीवनपद्धती प्रत्येक पंचवार्षिक योजनेगणिक नवे व चढे वेतन मिळाल्याने उंचावत गेली. तो नवश्रीमंत झाला. गरीब, निम्नवर्गीयही अस्मिता व अस्तित्व भानामुळे रोज वर चढत गेला. झोपडपट्टीतही टी.व्ही., टेलिफोन, मोबाईलच्या रिंग नि टोनचे स्वर घुमू लागले. सायकलीची जागा टू व्हिलरने व टू व्हिलरची जागा चारचाकीने घेतली. घर निवृत्तीच्या वेळी न बांधता नियुक्ती होताच घेण्याचा फंडा जोर धरू लागला. ‘पळा पळा... पाहू कोण पुढे येतो ते'ची स्पर्धा इतकी जीवघेणी झाली की, प्रत्येक माणसाचा ‘कांचनमृग' झाला. जो तो राजा मिडास' होण्याची कृती करू लागला. त्याला आपली मुलं पैशाची यंत्रं व्हावी असं वाटू लागलं. ती मुलं न राहता पालकांनी आपल्या मुलांना एटीएम् बनवलं.
  ‘असतील तर पैसे'च्या जागी ‘हरघडी पैसे' (Any Time Money) त्याचं जीवन तत्त्वज्ञान बनलं. ‘पैसे मिळवणं' हे एकच जीवनध्येय बनल्यानं माणसानं मूल्यविवेक गमावला. विवेक विसरून भ्रष्टाचार करायचा नि शील विकून समृद्धीचं शिखर गाठायचं यात इथल्या स्त्री-पुरुषांना काहीच गैर वाटेनासं झालं. विचार करायचा मन नावाचा अवयव त्यानं सत्ता, समृद्धी, संचय साधायचं साधन बनवलं. साधनांनाच त्यानं साध्य बनवलं.कुटुंबात माणूस पाहुणा झाला. संवाद संपला. देणं हे कर्तव्य ठरल्यावर ‘दिलं की संपलं' असा दुरावा आला. मुलं वासनेची फळं झाली. पति-पत्नी नर-मादी बनत गेले. हे वाचताना अंगावर येत असलं तरी हे आपलं नाकारता न येणारं समाजवास्तव बनलं आहे. या सर्वांतून आपल्या कुटुंबातील पति-पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण ही एके काळी असलेली जिवाभावाची नाती जीवघेणी बनू लागली. जगण्याचा गुंता वाढत जाऊन नात्यातील गुंतागुंत वाढत गेली. प्रेम, ममत्व, जिव्हाळा, आपुलकीसारखे शब्द कवितेतच राहिले. जगण्यात काम, क्रोध, मत्सर, जुगुप्सा, ईर्षा, अधिकार इ. भावभावनांचे साम्राज्य निर्माण झालं. पति-पत्नी सात जन्माचे न राहता न संपणाच्या आयुष्यात प्रतीक्षित प्रवासी झाले. महागडे उपचार, औषधं, साधनं, शिक्षण यामुळे मुलं आनंदाचे क्षणाचे सोबती बनले. लहान मुलं ‘हवीशी' मोठी होतील तशी ‘नकोशी' बनू लागली. परस्पर राग, द्वेष, संशय यामुळे पिढ्यांतील संघर्ष तीव्र बनला. आई-वडिलांची कमाई, इस्टेट हवी पण ते नको अशी आत्मकेंद्री, स्वार्थी मनोवृत्ती जगण्याची शैली बनली. त्याचे साक्षीदार बनलेली मुलं... ती अकाली प्रौढ बनली. लाड, प्रेम, अतिरिक्त सुख साधनं सहज मिळाल्यानं पाल्यं शेफारलेली अपत्यं बनली.

प्रशस्ती/१०८