पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अलीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश देण्याची मागणी पुरोगामी कार्यकर्त्यांनी केली. श्रेयवादाच्या स्पर्धेत प्रतिगामी पाऊलच यशस्वी होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘जागर मंदिर प्रवेशाचा वृत्तविशेषात जात, धर्म हे भेदापलिकडे मनुष्यकेंद्रित समाजनिर्मितीचा अडसर असल्याने तो जोवर आपण दूर करणार नाही तोवर असेलच तर परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद लेखक व्यक्त करतो. हे त्याच्या मानवतावादी वृत्तीचा पुरावा होय.
  हे नि असे अनेक विशेष वृत्तांत कोल्हापूरचे रंग, ढंग'मध्ये आहेत. साहित्य, सहकार, प्रबोधन, महाविद्यालयात युवक साजरे करत असलेले विविध दिन- साडी डे, टाय डे, व्हॅलेंटाईन डे इ. पुरस्कार, स्त्री विकास व शिक्षण, शेतकरी मालाचा भाव, हक्क आणि मूल्यांचा संघर्ष, तंटामुक्ती, निर्मलग्राम, जलस्वराज्य, बंदीबांधवांचे ग्रंथालय असे विषय वैविध्य यात आहे. त्यातून कोल्हापूरचा सांस्कृतिक परीघ रोज कसा रुंदावत निघाला आहे त्यांचे आश्वासक चित्र एका बाजूला अन् दुसरीकडे त्या उपक्रमांची पडछाया म्हणून पसरणारे दोष - साच्यांचं सम्यक चित्र या रंग-ढंगात आहे. इथला शिक्षक, प्राध्यापक अतिरिक्त सुरक्षा, समृद्धीमुळे 'नेता' कसा बनला याचे विदारक चित्र माळी यांनी उभं केलं आहे. एके काळी शिकवण्यापलीकडचा विचार न करणारा ‘गुरुजी', ‘मास्टर' आज ‘सर' झाला खरा पण मूल्य हरवल्यानं त्याची समाज प्रतिष्ठा घसरतीला कशी लागली याचं वस्तुनिष्ठ चित्र समस्त शिक्षक समाजाला अंतर्मुख करेल अशी ताकद या लेखनात आहे. या लेखनाचे संस्कार मूल्य मोठे आहे. हे लेखन केवळ चिमटे नाही घेत ते तुम्हाला प्रश्न करतं... विचार करायला भाग पाडतं. बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना आपल्या खर्चातून रोज १० काढून ठेवून बचत करणारं पाटील नावाचं कुटुंब... त्यांचा उपक्रम वाचून तुमचे हात दाते होतात... हे या लेखनाचं यश!
 वृत्तपत्रातील सूर्योदयाला उगवणारी वृत्त सूर्यास्ताबरोबर अस्तंगत भले होत असतील, पण अप्पासाहेब माळींचं लेखन आयुष्यभर तुम्हाला अस्वस्थ करून पाठलाग करत राहतं. ही असते या लेखनाची चिरंतन ताकद! बालपण, बुवाबाजी, “यस आय कॅन’, ‘तहान दुधाची' सारखं लेखन वृत्तपत्री असलं तरी त्यातलं ललित सौंदर्य कमी नाही. हे लेखन रिपोर्ताज शैलीच्या औपचारिकतेस छेद देऊन आत्मस्वर बनतं नि म्हणून वाचकांच्या हृदयाला भिडतं.

 आप्पासाहेब माळी यांनी निरंतर लिहीत राहावं. त्यांच्यातला अस्वस्थ

प्रशस्ती/१०२