पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



माळी यांनी तरुण भारतात लिहिली असतील. पैकी निवडक विशेष वृत्तांचं संकलन त्यांनी केलं आहे. त्यास ग्रंथरूप देऊन ‘कोल्हापुरी रंग ढंग' घेऊन ते वाचकांना पुन्हा सादर करीत आहेत. या उपक्रमाबद्दल प्रथमतः मी त्यांचे स्वागत करतो. त्यांचा हा पहिलाच ग्रंथ असल्याने त्यांचे अभिनंदनही करतो.
 ‘कोल्हापुरी रंग-ढंग' वाचताना माझ्यासारख्या तरुण भारताच्या नित्य वाचकास पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल, पण नववाचकास कोल्हापूरची संस्कृती, माणसं, वृत्ती, उपक्रम विकासाच्या पाऊलखुणा उमजतील. कोल्हापूर ही राजर्षी शाहू छत्रपतींच्या सुधारणांच्या पाश्र्वभूमीवर विकसित झालेली भूमी आहे. तिच्यात मातीतून आलेलं रांगडेपण आहे नि रंगेलीही! अलीकडच्या काळात हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. सहकाराची घट्ट वीण असलेल्या या प्रदेशानं इथल्या शेतक-यास समृद्ध केलं. इथं दूध, साखर, गूळ, कुक्कुटपालन इ. तून आलेला चौपट पांढरा नि करमुक्त पैसा आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश इ.च्या तुलनेनं इथं समृद्धी आहे. दरडोई शिक्षणमान आणि अर्थमानाचा आलेख निरंतर चढता राहिला आहे. त्यामुळे इथे गावसमृद्धी आहे. माणसं स्वतंत्र विकास वृत्तीची आहेत. 'घेतलं तर डोक्यावर नाही तर पायदळी' असा इथला प्रघात आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी इथं हिरिरीने केली जाते. पूर्वीचं इथलं गाव वेशीतलं होतं. आता त्याने सर्व प्रकारच्या तटबंदी तोडल्यात. गावच्या आळी, गल्ल्या, पक्ष, संस्था, अण्णा-भाऊ-दादांचे गट यात विभागल्यात. नोकरी, लग्न, सभासदत्व सान्याला एकच ओळख राहिली... हा कोणत्या गटाचा? गावचे सर्व निर्णय निवडणूक, विकास योजना, दारूबंदी सारं गट ठरवतो. भाऊबंदकी मागं पडून अर्थसंबंध, हितसंबंध महत्त्वाचे ठरू लागले. त्याचे परिणाम इथल्या जनमानसावर नित्य उमटत राहतात. अप्पासाहेब माळींचं हे लेखन बदलत्या जनमानसाचं चित्रण आहे, आरसा आहे.

 ‘उत्सवप्रिय कोल्हापूर' मध्ये कोल्हापुरात होणा-या विविध महोत्सवांची नोंद घेऊन इथं घडणारं सांस्कृतिक परिवर्तन टिपलं आहे. या नोंदीत गुण आहेत तसे दोषदिग्दर्शनही! पण हेतू स्वच्छ आहे. उत्सव, व्यापक, सर्वसमावेशक होतील तर जनसहभाग राहील. अलीकडे महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर प्रभृतींचा जयजयकार सवंग पद्धतीने होताना पाहून माळी अस्वस्थ होतात. तसबिरी लावण्यापेक्षा... की जय पुकारण्यापेक्षा महनीय व्यक्तींचे विचार आमचा आचारधर्म होईल तो सुदिन... महापुरुषांना वापरण्याच्या वृत्तीवर आप्पासाहेबांमधील पत्रकार नेमकेपणाने बोट ठेवतो.

प्रशस्ती/१०१