पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसांनी साधने गोळा करायला सुरवात केली आणि संघटना तयार करायला सुरवात केली. शेपटी लहान आहे का मोठी, याच्यावर काही तो उत्क्रांतीत टिकून राहील किंवा नाही, हे आता अवलंबून राहिलेले नाही. त्याच्या हाती साधन कोणते आहे आणि तो स्वतःची संघटना कशी बांधतो याच्याने त्याचे उत्क्रांतीत टिकून राहणे ठरते. म्हणूनच कुटुंब, गाव, जाती, धर्म, राष्ट्र अशा स्वतःच्या जाणिवा असलेल्या संघटना इतिहासात तयार झालेल्या दिसतात. दोनतीनशे वर्षांपूर्वी राष्ट्र ही जाणीव काहीशी भव्य आणि उदात्त होती तशी जाणीव, राष्ट्राचा अहंकार आज कुठेच शिल्लक राहिलेला नाही, ही गेल्या दहा वर्षांत घडलेली महत्त्वाची घटना आहे. ज्यांची आर्थिक प्रगती झाली आहे, ती मंडळी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या एका नवीन जाणिवेचा प्रयोग करीत असतीलही कदाचित्; पण आपल्यासारख्या आर्थिकदृष्ट्या अप्रगत (किंवा प्रगतिशील) देशांना ते परवडत नाही; म्हणून नवीन जाणिवा तयार करण्याऐवजी जुनी मढी उकरून त्यांच्या जाणिवा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडे होत आहे.
 राष्ट्र ही संकल्पना कमी महत्त्वाची झाली, राजकारणी कमी महत्त्वाचे झाले; त्यामुळे साहजिकच, हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व हे आता राजकारण्यांत सापडणे दुर्मिळ झाले आहे. ते जितके दुर्मिळ होईल, तितके आहेत त्याच दगडांना शेंदूर फासून, त्यांनाच एकदम मोठे म्हणण्याची पद्धतही वाढली आहे. हे आपल्या देशातही घडत आहे.
 राजीव गांधी चांगले असतील, कर्तबगार असतील, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली, हेही खरे असेल; पण महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू किंवा जवाहरलाल नेहरू या सगळ्यांपेक्षा ते मोठे आहेत म्हणणे किंवा विश्वनाथ प्रताप सिंहांनी मंडल आयोगाविषयी घेतलेली भूमिका मोठी लोकप्रिय आहे म्हणून त्यांची एकदम गौतम बुद्धाशी तुलना करणे म्हणजे राजकारणातल्या व्यक्तीची गुणवत्ता जितकी कमी, तितकी जास्त स्तुती त्याच्या चमच्यांनी करावी अशी एक प्रवृत्ती आज राजकारणात निर्माण झाली आहे याचे उदाहरण आहे. ही गेल्या दहा वर्षांच्या राजकारणात घडत आलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे.

 गेल्या दहा वर्षांत घडलेली तिसरी महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी क्रांतिकारक गोष्ट म्हणजे एका विशिष्ट विचाराच्या हुकूमशाहीचा अंत झाला. मी या हुकूमशाहीला मार्क्सवादी डाव्या विचाराची हुकूमशाही म्हणतो. तुम्हाला जर चार बुद्धिमान लोकांमध्ये गणले जायचे असेल, तर तुम्ही तुमचेच म्हणणे मार्क्सने मांडलेल्या सिद्धांतांच्या समीकरणांमध्ये बसवून मांडायला हवे; तरच तुम्हाला मान्यता

पोशिंद्यांची लोकशाही / १०