पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आढावा दहा वर्षांच्या राजकारणाचा


 गेल्या दहा वर्षांतील राजकारणाचा आढावा घेण्यासाठी राजकारण म्हणजे शासनाशी संबंधित असलेली आणि शासन म्हणजे देशाची राजकीय व्यवस्था चालविणारी यंत्रणा अशी एक ढोबळ व्याख्या आपण धरूया.
 हा आढावा घेताना गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर जगातील अन्य देशांच्याही राजकारणात किंवा राज्यकारणात म्हणा, ज्या काही प्रवृत्ती दिसतात त्यांचाही आढावा मांडला पाहिजे.
 गेल्या दहा वर्षांमध्ये राष्ट्र ही संकल्पना फार झपाट्याने कालबाह्य झाली आहे. तसे अजूनही देशादेशांत राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांच्या निवडणुका होतात, ते शपथा घेतात, इतकेच नव्हे तर राष्ट्राध्यक्षांच्या भोवती असणाऱ्या पहारेकऱ्यांची संख्या वाढली आहे आणि कोणत्याही कारणाने होणाऱ्या फीत कापण्याच्या समारंभाच्या प्रसंगी होणारा डामडौलही वाढला आहे; पण प्रत्यक्षामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान या दोघांच्याही हातातील सत्ता झपाट्याने निघून गेली आहे.
 अमेरिकेसारख्या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष हा कदाचित् टेलिव्हिजनवरून लढाई जाहीर करण्याचे काम करीत असेल; पण त्याच्या हाती सत्ता आहे असे म्हणणे कठीण आहे. आज अमेरिकेत 'अमेरिकेची राष्ट्रीय जाणीव' यापेक्षा अमेरिकेतल्या वेगवेगळ्या 'बहुराष्ट्रीय कंपन्यांची जाणीव' ही राजकीयदृष्ट्या जास्त मोठी आणि प्रभावशाली ताकद तयार होते आहे. राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टनंतर पहिल्या श्रेणीचा मनुष्य अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कधी बनला नाही, आज पहिल्या श्रेणीचा मनुष्य एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचा उपाध्यक्ष बनेल; पण राष्ट्राध्यक्ष बनत नाही, हा या गोष्टीचा अत्यंत चांगला पुरावा आहे.

 यात तसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ही स्थिती म्हणजे मनुष्यजातीच्या इतिहासातील उत्क्रांतीची एक पायरी आहे. उत्क्रांतीमध्ये समाज तयार झाल्यानंतर

पोशिंद्यांची लोकशाही /९