पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या या हिंदुत्वाचा अर्थ असा, की लोकांच्या मनातील विद्वेषभावनांवर कुंकर घालणे, श्रीनगर किंवा इतर ठिकाणच्या काही मुसलमान व्यक्तींच्या कृत्याचे दाखले द्यायचे आणि त्यामुळे हिंदू तेवढे जात्याच राष्ट्रप्रेमी आणि मुसलमान तेवढे-विरुद्ध पुरावा नसेल तर राष्ट्रद्रोही; त्यांना सर्वांना पाकिस्तानात पाठविले पाहिजे, मशिदी पाडल्या पाहिजेत, हिंदू राष्ट्र तयार झाले पाहिजे...अशा तऱ्हेचा विचार म्हणजे शिवसेनेचे हिंदुत्व.
 अशा तऱ्हेचा विचार करून, १९८७ मध्ये शिवसेनेने विलेपार्ले येथील एक पोटनिवडणूक जिंकली.
 ऑगस्ट १९८९ मध्ये शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे राज्यस्तरावील राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी शिवसेनेची एक घटनाही त्यांनी निवडणूक आयोगापुढे ठेवली. आजपर्यंत ही घटना गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. या घटनेत शिवसेना निधर्मी व लोकशाहीवादी पक्ष असल्याचे जाहीर केले आहे. या दस्तावेजाच्या आधाराने शिवसेनेस राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.
 ७ एप्रिल १९८९ रोजी, विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू यांची झालेली निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्याने रद्द ठरविली.
 त्यानंतरही शिवसेना हिंदुत्वाचा प्रचार करणार, शिवसेनेचा लोकशाहीवर विश्वास नाही, निवडणूक आयोगापुढे सादर केलेला दस्तावेज म्हणजे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी केलेले नाटक होते, असे खुलेआमपणे शिवसेनेचे नेते गुरकावीत होते.
 १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपला विषारी प्रचार चालू ठेवला आणि विधानसभेवर भगवा झेंडा फडकावण्याच्या उन्मादात १९९० च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेच्या नेत्यांनी अत्यंत बेताल आणि निरर्गल प्रचार केला.

 शिवसेनेचा प्रचार हा संविधान-विरोधी होता असा पहिला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वामनराव महाडिक यांची निवडणूक रद्द ठरवताना दिला. त्यानंतर गोरेगाव, केज, कुर्ला येथील शिवसेनेच्या उमेदवारांच्या निवडणुकाही मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या आहेत, एवढेच नव्हे तर शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे, मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यावर गुन्हेगारीची व्यक्तिगत जबाबदारी ठेवण्याचे ठरविले आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / २४