पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाठीशी राहतात, त्यासाठी मुंबई सोडायची अजिबात जरुरी नाही. हा फायदा हिंदुत्वावाद्यांना आहे, इस्लामवाल्यांना आहे, दलितवाल्यांना आहे, यासिर अराफतला आहे, सगळ्यांना आहे. यांना कोणताही प्रश्न सोडविण्याची इच्छा नसते, त्यांना या प्रश्नांचे भांडवल करून, राजकारण कसे करता येईल, यात स्वारस्य असते. प्रश्न संपण्याची नाही, तर या प्रश्नाच्या आधाराने पुढे कसे जाता येईल इतकीच यांची भावना असते, राष्ट्रध्वज जाळणाराचे हात कापावे, हे ठीक आहे; पण मग पाकिस्तानला गुप्त रहस्य विकणारे जर शर्मा आणि वर्मा असतील, तर कुणाकुणाचे हात कापायचे असे विचारले, तर ते म्हणतात, की असा हिंदुत्ववाद आम्ही मानीतच नाही. जे राष्ट्रीय आहेत, ते आमचे आणि हिंदूंमध्ये अराष्ट्रीय असतील ते आमचे नाहीत; मग त्याला हिंदुत्व शब्द का वापरतात, सर्वसाधारणपणे राष्ट्रीयत्व असे म्हणून प्रश्न का मिटवत नाहीत? कारण त्यामुळे एक फायदा जातो. हिंदू शब्द वापरल्याने कमी कष्टांमध्ये लोकांच्या भावनांना आवाहन करण्याचे जे साधन आहे, ते हातचे निघून जाते.
 आज काँगेसमध्येही महात्मा गांधी कोणी नाही. सगळेजण सुटावर टाय लावून बसलेले असताना, पंचा नेसून काँग्रेससमोर येण्याची हिंमत असलेले लोक गेले. लोकांना दिशा दाखविणारे नेते पूर्वीच गेले. हल्ली लोकांची दिशाभूल करूनच राजकारण करणारे नेते राहिले आहेत. परिस्थितीने अगतिक, लाचार बनलेले लोक सांगतात, की तुम्ही अमुक अमुक करणार असाल, तरच आम्ही तुमच्यामागे येतो. सरावलेले नेतेही लोकांच्या डोळ्यात बघून, कशाच्या आश्वासनावर हे आपल्या मागे येतील, याचा हिशेब करून, आपले सगळे राजकारण मांडतात.
 माणसांची नीतिमत्ता लोप पावली आहे असे नाही, तर देशाच्या विकासाचा प्रवाहच थांबला आहे, पुढे काही आशादायक दिसत नाही, हे या परिस्थितीचे प्रमुख कारण आहे. एखादा प्रवाह चालू असता म्हणजे त्यात शेवाळ साठत नाही, किडे होत नाहीत आणि किड्यांची मारामारीही होत नाही. मग, गांधी आणि राजाजी असताना राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा प्रचार तामिळनाडूमध्ये सगळ्यांत जास्त होत होता. त्या गांधींच्याऐवजी सिंथेटिक गांधी आल्यानंतर त्याच तामिळनाडूमध्ये हिंदीला सगळ्यांत जास्त विरोध होऊ लागला आहे. आपल्याला जर का विकासाचा प्रवाह खुला करता आला, तर या अशा लहानसहान क्षुद्र जाणिवांना गोंजारून, नेतृत्व कमावणाऱ्या लोकांना या देशाच्या राजकारणात काही स्थान राहणार नाही.

 मंडल आयोगाच्या शिफारशींच्या निमित्ताने देशात संघर्ष सुरू झाला, त्या

पोशिंद्यांची लोकशाही / १५