पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पुढारी, नोकरदार आणि गुंड हे देशबुडवे. शेतकरी संघटनेच्या नागपूर अधिवेशनाची घोषणा – "नेता, तस्कर, गुंडा, अफसर, मंडल, मंदिर, मस्जिदवादी, देश के दुष्मन." देश बुडायला आला आहे; पण त्यांना त्याची पर्वा नाही.
 मग, या निवडणुकीमध्ये स्वतंत्र भारत पक्ष नावाचा मंच शेतकरी संघटनेने का तयार केला?
 १९८० मध्ये मी शेतकऱ्यांना सांगितलं, की स्वातंत्र्य मिळालं, तरी तुमची गरिबी हटली नाही; कारण हे सरकार. 'शेतकऱ्याचं मरण, हे सरकारचं धोरण, हे मी १९८० मध्ये सांगितलं. आज केवळ शेतकऱ्यांची संघटना बांधून चालणार नाही. आज, मी हिंदुस्थानातल्या सगळ्या लोकांना – पुढारी, नोकरदार आणि गुंड सोडून, सगळ्यांना सांगतो आहे, की सरकारचं धोरण फक्त शेतकऱ्याचे मरण नाही; सरकारचं धोरण म्हणजे देशाचं मरण आहे. देश वाचविण्यासाठी सगळ्यांनीच उठलं पाहिजे.
 देश कसा काय वाचवायचा? हे कठीण काम आहे का ? मुळीच नाही. शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाचा विस्तार करून, स्वतंत्र भारत पक्षाने एक तीसकलमी कार्यक्रम आखला आहे. देशाचा रोग काय आहे ? नेहरूंचा समाजवाद. स्वातंत्र्याच्या आधी आपण समाजवादाविषयी कधी बोललो नव्हतो. गांधीवाद हा स्वातंत्र्यचळवळीचा पाया होता आणि तोच उद्देश होता. थोडक्यात सांगायचे तर गांधीवाद म्हणजे 'गाव मोठं,शेती मोठी, सरकार छोटं.' गांधीजी गेले आणि दिवाणजी म्हणून नेहरूंच्या हाती किल्ल्या आल्या आणि त्यांनी मालकांची पोरं देशोधडीला लावली आणि ते म्हणू लागले, "शहर मोठं, कारखाना मोठा आणि सरकार त्याहूनही मोठं." देशाचा रोग हा आहे; मग त्यावर औषध काय?
 या रोगावर औषधयोजना करायला हवी, झपाट्यानं करायला हवी. हा रोग झाला आहे, हे मनमोहन सिंगही मानतात. पी. व्ही. नरसिंह रावसुद्धा म्हणतात, की नेहरूंनी देशाचं वाटोळं केलं. या शब्दांत म्हणत नसले, तरी ते म्हणतात त्याचा अर्थ हाच होतो; पण औषधोपचार करायचा म्हटला, की मात्र काँग्रेसचे हातपाय लटपटतात. काहीजण म्हणतात, औषधोपचार हळूहळू केला पाहिजे.

 औषधोपचार काय आहे? गेल्या सत्तेचाळीस वर्षांमध्ये देशामधील उत्पादक घटकांवर जी काही बंधन घातली - लेव्ही, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा, मालमत्तेसंबंधी हक्कांवरील बंधने, व्यवसाय-व्यापार उदीमावरील बंधने इत्यादी झटकन काढून टाकली पाहिजेत. काँग्रेस सरकारचे म्हणणे ती हळूहळू काढावीत. म्हणजे कसं होणार? कुत्र्याचं शेपूट तोडायचे असेल, ते झटकन

पोशिंद्यांची लोकशाही / १०१